पुणे; पुढारी वृत्तसेवा: महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात येत असलेल्या महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2021 संयुक्त पेपर 1च्या परीक्षेवेळी एक उमेदवार गैरप्रकार करताना आढळला. गैरप्रकाराच्या उद्देशाने लपवलेले मोबाईल फोन आणि ब्लूटूथ इअरफोन इत्यादी साहित्य सापडले. केवलसिंग चैनसिंग गुसींगे असे त्याचे नाव आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेऊन संबंधित उमेदवारावर एमपीएससीकडून कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
एमपीएससीकडून महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2021-संयुक्त पेपर 1 राज्यभरातील सहा जिल्हा केंद्रांवर घेण्यात आली. या परीक्षेच्या विविध उपकेंद्रांच्या ठिकाणी आयोगाच्या दक्षता पथकाने संशयित उमेदवारांची तपासणी केली. त्यामध्ये पुणे जिल्हा केंद्रांवरील नर्हे येथील उपकेंद्रावर केवलसिंग गुसींगे या उमेदवाराकडे मोबाईल फोन आणि ब्लूटूथ इयर फोन इत्यादी साहित्य सापडले. या प्रकाराची एमपीएससीकडून गंभीर दखल घेत एमपीएससीच्या नियमानुसार कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती एमपीएससीने ट्विटद्वारे दिली आहे.