Latest

ऊस पिकातील हुमणीचे एकात्मिक नियंत्रण

backup backup

महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पुरेसा पाऊस न झाल्यामुळे हुमणी या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. भारतात हुमणीच्या साधारणपणे 300 प्रजातींची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात प्रमुख दोन प्रकारच्या हुमणी आढळतात. त्यास नदीकाठावरील (लिकोफोलीस) आणि माळावरील (होलोट्रॅकिया) हुमणी अशा संबोधल्या जातात. तसेच मागील 5-6 वर्षांमध्ये नवीन दोन प्रकारच्या हुमणीच्या प्रजाती (फायलोग्यथस आणि डोरेट्स) आढळल्या आहेत. या जातींचे वैशिष्ट्य असे आहे की, त्या जास्त हलक्या जमिनीत व कमी पाण्याच्या प्रदेशात जास्त आढळतात. हुमणीच्या प्रादुर्भावामुळे उसाच्या उगवणीत 40 टक्क्यांपर्यंत नुकसान होते तसेच ऊस उत्पादनात 15 ते 20 टनांपर्यंत नुकसान होते, त्यामुळे हुमणी किडीचा बंदोबस्त योग्य वेळी (मे-ऑगस्ट) करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

नुकसानीचा प्रकार

प्रथम अवस्थेतील हुमणीच्या अळ्या अंड्यातून बाहेर निघाल्यावर जमिनीतील कुजलेल्या सेंद्रिय पदार्थावर किंवा जिवंत मुळे असल्यावर मुळांवरच उपजीविका करतात. त्यांनतर दुसर्‍या व तिसर्‍या अवस्थेतील अळ्या ऊस व इतर पिकांची मुळे जून – ऑक्टोबर महिन्यात खातात. मुळे खाल्ल्यामुळे पिकाचे अन्न व पाणी घेण्याचे कार्यच बंद पडते. प्रादुर्भावग्रस्त ऊस निःस्तेज दिसतो व पाने मरगळतात. पाने हळूहळू पिवळी पडण्यास सुरुवात होते व 20 दिवसांमध्ये संपूर्ण ऊस वाळतो आणि वाळक्या काठीसारखा दिसतो. उसाच्या एका बेटाखाली जास्तीत जास्त 20 पर्यंत अळ्या आढळतात. उसाचे एक बेट एक अळी तीन महिन्यांत, तर दोन किंवा जास्त अळ्या एक महिन्यात मुळ्या कुरतडून कोरडे करतात. जमिनीखालील उसाच्या कांड्यांनाही अळी उपद्रव करते. प्रादुर्भावग्रस्त उसाला हलका झटका दिल्यास ऊस सहजासहजी उपटून येतो. अळीचा प्रादुर्भाव जास्त असल्यास 100 टक्क्यांपर्यंत नुकसान होते. हेक्टरी 20 ते 25 हजारांपर्यंत अळ्या सापडल्यास साधारणपणे 15 ते 20 टनांपर्यंत नुकसान होते. बारा महिन्यांत हुमणीची एकच पिढी तयार होत असली तरी अळीचा जास्त दिवसाचा कालावधी आणि पिकाच्या मुळांवर उपजीविका करण्याची क्षमता यामुळे पिकाचे जास्त प्रमाणात नुकसान होते.

आर्थिक नुकसानाची संकेतपातळी

एक हुमणीची अळी प्रति घनमीटर अंतरात आढळून आल्यास कीड नियंत्रण सुरू करावे. हुमणीग्रस्त शेतात पावसाळ्यात कडुनिंब अथवा बाभळीची पाने अर्धचंद्राकृती खाल्लेली आढळल्यास नियंत्रणाचे उपाय योजावेत.

हुमणीचा जीवनक्रम (होलोट्रॅकिया) :

हुमणी किडीचा जीवनक्रम अंडी, अळी, कोष व भुंगेरे या चार अवस्थांमध्ये पूर्ण होतो. मान्सूनच्या पहिल्या सरींनंतर हुमणीचे प्रौढ भुंगे संध्याकाळी जमिनीतून बाहेर येतात आणि कडुनिंब, बाभूळ, बोर आदी झाडांची पाने खातात. नर-मादीचे मीलन होते व त्यानंतर मादी जमिनीमध्ये अंडी घालते. अळीची पहिली अवस्था 25 ते 30 दिवस (जून), दुसरी अवस्था 30 ते 45 दिवस (जून- जुलै) व तिसरी अवस्था (जुलै-ऑक्टोबर ) 140 ते 145 दिवस असते. तिसर्‍या अवस्थेतील पूर्ण वाढ झालेली अळी जमिनीत खोल गेल्यानंतर कोषावस्थेमध्ये जाते अशा पद्धतीने एक पिढी पूर्ण होण्यासाठी एक वर्षाचा कालावधी लागतो.

एकात्मिक कीड नियंत्रण पद्धती, पारंपरिक पद्धती

उन्हाळी पावसाच्या सरी येण्यापूर्वी जमीन तयार करताना जमिनीची खोल नांगरट करावी. त्यामुळे किडीची अंडी, अळी सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येऊन नष्ट होतात, तसेच जमिनीतून बाहेर आलेल्या सुप्त अवस्थांना पक्षी खाऊन टाकतात. पिकाची फेरपालट या किडीच्या यजमान पीक नसलेल्या उदा. सूर्यफूल पिकासोबत करावी. त्यामुळे किडींचा नायनाट होतो. सापळा पीक पद्धतीचा वापर करावा. उदा. उसामध्ये भुईमूग लावावा.

प्रौढ भुंगेरे गोळा करणे

मान्सूनच्या पहिल्या सरीनंतर भुंगेरे जमिनीतून बाहेर पडतात व रात्रीच्या वेळी बाभूळ व कडुनिंबाच्या झाडावर मोठ्या प्रमाणावर जमा होतात. संध्याकाळी 7 ते 9 च्या दरम्यान फांद्या हलवून जमिनीवर पडलेले भुंगेरे गोळा करून रॉकेलमिश्रित पाण्यात टाकून मारावेत. तसेच प्रकाश सापळ्यांचा वापर भुंगेरे गोळा करण्यासाठी करावा.

रासायनिक पद्धती :

कडुनिंब अथवा बाभळीच्या झाडावर इमिडाक्लोप्रिड ( 17. 8 % एसएल ) 0. 3 मिली प्रति लिटर पाण्यातून फवारल्यास भुंगेर्‍यांचा बंदोबस्त होतो.

शेणखत, कम्पोस्ट खत आदीमार्फत हुमणीची अंडी व अळ्या शेतामध्ये जातात. त्यासाठी एक बैलगाडी शेणखतात 1 किलो 0. 3 जी .आर फिप्रोनील दाणेदार मिसळून शेतात टाकावे.

मोठ्या उसात जून-ऑगस्ट कालावधीत फिप्रोनील 40 % व इमिडाक्लोप्रिड 40 % डब्ल्यू जी 500 ग्रॅम / हेक्टरी 1000 लिटर पाण्यात मिसळून जमिनीत द्यावे.

जैविक पद्धत

यामध्ये प्रामुख्याने किडींच्या नैसर्गिक शत्रूंचा वापर केला जातो. 'जीवो जीवस्य जीवनम' या उक्तीप्रमाणे हुमणीचे नैसर्गिक शत्रू बुरशी, सूत्रकृमी यांचा वापर किडींचा नायनाट करण्यासाठी केला जातो. बव्हेरिया बॅसियाना, मेटारायझियम निसोपली या बुरशींचा वापर हुमणी नियंत्रणासाठी केला जातो. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने जैविक कीड नियंत्रक विकसित केले आहे. हे हुमणीच्या अळ्या व भुंगेरे यावर वाढणार्‍या परोपजीवी बुरशींचा समूह असलेले द्रवरूप औषध आहे. यामध्ये बव्हेरिया बॅसियाना, मेटारायझियम निसोपली, व्हर्टिसिलिअम लेकॅनी या परोपजीवी बुरशीसह बॅसिलस थुरिंजेनेसिस या जीवाणूंचा समावेश आहे. हुमणीच्या प्रभावी नियंत्रणाकरिता जैविक कीड नियंत्रक (बी.व्ही.एम) या औषधाचा वापर एकरी 2 लिटर 400लिटर पाण्यात मिसळून जमीन वाफशावर असताना बेटाजवळ आळवणी पद्धतीने करणे गरजेचे आहे. हे उत्पादन वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी बु. तसेच विविध साखर कारखान्यांवरती उपलब्ध आहे.

परोपजीवी सूत्रकृमीद्वारे (ई.पी.एन- एंटोमो पॅथोजनिक निमॅटोड) हुमणीचे नियंत्रण

यामध्ये वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने विकसित केलेल्या द्रवरूप ई.पी.एन. (एंटोमो पॅथोजनिक निमॅटोड) चा वापर करून प्रभावीरीत्या हुमणीचे नियंत्रण शक्य आहे. हे जमिनीमध्ये आढळणारे सूत्रकृमी असून, जमिनीमधील हुमणीला शोधून तिच्या शरीरावरील छिद्रांवाटे किंवा तोंडावाटे शरीरात प्रवेश करतात. किडीला रोगग्रस्त करून तिच्या शरीरात वाढतात. मृत किडीच्या शरीरातून बाहेर पडून जमिनीमध्ये दुसर्‍या हुमणीला शोधून रोगग्रस्त करतात. एकरी एक लिटर ई.पी.एन प्रति 400 लिटर पाणी या प्रमाणात पिकाच्या मुळांशी वाफसा स्थितीत आळवणी केली असता प्रभावीरीत्या हुमणीच्या नियंत्रण करता येते. ई.पी.एन हे हुमणीचे नैसर्गिक शत्रू असल्यामुळे त्याचा जमिनीतील उपयुक्त जीवाणू, वातावरण, पिकावर, तसेच मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होत नाही. हे उत्पादन वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी बु. तसेच विविध साखर कारखान्यांवर उपलब्ध आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT