Latest

उमेदवारांच्या खर्चात आढळली तफावत; ३२ उमेदवारांना खर्च निरीक्षकांची नोटीस

Shambhuraj Pachindre

छत्रपती संभाजीनगर; पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान उमेदवारांनी केलेल्या खर्चाची तपासणी शुक्रवारी (दि.4) करण्यात आली. यावेळी दोन अपक्ष उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी अनुपस्थित होते. तर पक्ष आणि अपक्ष अशा ३२ उमेदवारांनी खर्च दाखल केला. त्यांच्या खर्चात मोठी तफावत आढळून आली आहे. त्यामुळे त्यांना खर्च कक्षाचे नोडल अधिकारी शेखर कुलकर्णी यांनी नोटीस बजावल्याची माहिती सूत्रांनी दिली.

लोकसभा निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांना नवीन बँक खात्यातून निवडणुकीचा खर्च करण्याचे आयोगाच्या निर्देश आहेत. त्यानुसार, समितीने उमेदवारांना सर्व खर्चासंदर्भातील रकमा आकारल्या आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काढलेल्या रॅलीपासून २ मे पर्यंत केलेल्या खर्चाचा हिशेब शुक्रवारी खर्च कक्षाचे नोडल अधिकारी शेखर कुलकर्णी यांच्याकडे मांडण्यात आला.

यावेळी महाविकास आघाडीचे चंद्रकांत खैरे, महायुतीचे संदीपान भुमरे, एमआयएमचे इम्तियाज जलील यांनी खर्च मांडला. याचदरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अफसर खान यांच्यासह इतर १२ पक्षाचे उमेदवार, २० अपक्ष उमेदवारांनी खर्च मांडला. तर दोन अपक्ष उमेदवार अनुपस्थित होते. प्रमुख पक्षाच्या उमेदवारांनी मांडलेला खर्च वगळता इतर ३२ जणांच्या खर्चात समितीला तफावत आढळून आली. समितीने ठरवून दिलेल्या खर्चात तफावत असल्यामुळे शनिवारी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारासह इतर ३१ उमेदवारांना खर्च कक्षाचे नोडल अधिकारी कुलकर्णी यांनी नोटीस बजावल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

SCROLL FOR NEXT