Latest

उपग्रहाद्वारे घेणार ऊस क्षेत्राचा अंदाज

Arun Patil

राशिवडे ; प्रवीण ढोणे : लांबलेला हंगाम आणि शिल्लक राहिलेल्या उसाच्या डोकेदुखीमुळे आता जून 2022 च्या उत्तरार्धात उपग्रह प्रतिमांच्या आधारे पुढील वर्षी किती ऊसतोडणीसाठी उपलब्ध होईल, याबाबतचा अंदाज घेण्यात येणार आहे. प्रतिमा उपलब्ध झाल्यास पुन्हा साखर उद्योगातील प्रमुख व्यक्ती, संस्थांची बैठक 'इस्मा'च्या वतीने घेण्यात येणार आहे. यानंतर पुढील हंगामासाठीचा आराखडा तयार करण्यात येणार आहे.

जूनचा दुसरा आठवडा ओलांडला तरी पुणे विभागातील 1, अहमदनगर विभाग 1, औरंगाबाद विभागातील 4 तर नांदेड विभागातील 5 असे 11 कारखाने अद्याप सुरू आहेत. क्षमतेनुसार नोंद झालेला ऊस गाळप करूनसुद्धा मोठ्या प्रमाणात ऊस शिल्लक राहू लागल्याने राज्य शासनाने पश्चिम महाराष्ट्रातील ऊसतोडणी यंत्रे पाठवून देऊन ऊसतोड करण्याचा प्रयत्न केला.

गतवर्षीच्या तुलनेत यंदाचा हंगाम लांबला. जूनचा दुसरा आठवडा ओलांडला तरी राज्यातील 11 तर देशातील 29 कारखाने सुरू आहेत. अद्यापही दोन लाख टन ऊस शिल्लक आहे. लवकरच हा शिल्लक ऊस संपविला जाईल. यंदा ऊस क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली, तर त्या पटीने 199 कारखान्यांनी गळीत हंगाम घेतला.

कार्यक्षेत्रात कारखान्यांकडे नोंद असणार्‍या उसाची तोड झाल्यानंतर क्षमतेप्रमाणे अतिरिक्त उसाचे गाळप बहुतांश कारखान्यांनी केले आहे. हंगाम संपला तरीही दोन लाख टन ऊस शिल्लक आहे. अजूनही 18 कारखाने सुरू असून आठवडाभरात शिल्लक ऊसही संपविण्याचे नियोजन आहे.

SCROLL FOR NEXT