Latest

ईडीची मुंबईत इंडियाबुल्सवर छापेमारी

Arun Patil

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : काळ्या पैशांविरोधातील कायद्यान्वये दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सोमवारी इंडियाबुल्सच्या मुंबईतील मालमत्तांवर छापेमारी केली. ईडीच्या दिल्ली आणि मुंबईतील पथकांनी ही संयुक्त कारवाई केली आहे.

ईडीतील सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, इंडियाबुल्स हाऊसिंगचे प्रवर्तक समीर गेहलोत यांच्यासह संबधित कंपन्या आणि व्यक्तींवर गेल्यावर्षीच्या एप्रिल महिन्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली आहे.

या प्रकरणी पालघरमध्ये एक गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यात कंपनीने स्वत: पैसे काढत वाढीव किंमती दाखविण्यासाठी त्यांच्या स्वत: च्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली. यात काही रिअल इस्टेट कंपन्यांचा उल्लेख करण्यात आला आहे.

या कंपन्यांनी इंडियाबुल्सकडून कर्ज घेतले होते आणि पैसे इंडियाबुल्स हाऊसिंग शेअर्समध्ये परत केले होते. 2010 ते 2014 या काळात कंपनीकडून निधी पळवण्यात आल्याचा उल्लेख दाखल गुन्ह्यांत असल्याचे समजते.

चौकशीला स्थगितीचा दावा

ईडीने या छापेमारी दरम्यान काही महत्वपूर्ण दस्तऐवज ताब्यात घेतले आहेत. सोबतच ईडीने इंडिया बुल्स हाऊसिंग आणि इंडियाबुल्सशी संलग्न संस्थांकडून कर्ज घेणार्‍या पुण्यातील रिअल इस्टेट फर्मच्या प्रवर्तकांपैकी एकाला जबाब नोंदविण्यासाठी बोलावल्याची माहिती मिळते. दरम्यान, न्यायालयाने कंपनीविरोधातील चौकशीला स्थगिती देत कोणत्याही प्रकारची जबरदस्तीने कारवाई करण्यास मनाई केल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.

SCROLL FOR NEXT