Latest

ईडीकडून इक्बाल कासकर याच्या साथीदारांची मालमत्ता जप्त

Arun Patil

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम याला आणखी एक झटका देत सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर याच्या साथीदाराचा 55 लाख रुपये किंमतीचा फ्लॅट जप्त केला आहे. 2017 सालच्या एका खंडणीप्रकरणात मनी लाँड्रींग कायद्याच्या अन्वये ईडीने ही कारवाई केली आहे.

ठाण्यातील या खंडणीप्रकरणात इक्बाल कासकर याच्यासह त्याचे साथीदार मुमताज एजाझ शेख आणि इसरार अली जमील सय्यद यांनी दाऊद टोळीशी संबंधित असल्याचा फायदा उठवत बिल्डरला धमकावून हा फ्लॅट बळकावला होता. हा फ्लॅट मुमताज याच्या नावावर करण्यात आला होता. ईडीच्या तपासात याबाबत माहिती समोर आल्यानंतर ईडीने फ्लॅटवर जप्तीची कारवाई केली.

ठाणे पोलिसांनी सप्टेंबर 2017 मध्ये इक्बाल कासकर याच्यासह त्याच्या साथीदारांविरोधात दाखल केलेल्या खंडणीच्या गुन्ह्यात कासारवडवली पोलीस ठाण्याने महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा आणि अन्य भादंवि कलमांतील तरतुदीनुसार एक अंतिम अहवाल नोव्हेंबर 2017 मध्ये सादर केला होता. या गुन्ह्याच्या आधारे मनी लाँड्रींगचा गुन्हा दाखल करून ईडी तपास करत आहे. ईडीने यावर्षी 18 फेब्रुवारी रोजी इक्बाल कासकर याला ताब्यात घेत गुन्ह्यातील सहभागासाठी अटक केली होती. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे.

गुन्ह्यातील फिर्यादी सुरेश मेहता हे एक बांधकाम व्यावसायिक आहेत. ते त्यांच्या भागीदारासोबत दर्शन एंटरप्रायझेस या कंपनीच्या माध्यमातून बांधकाम व्यवसाय चालवतात. त्यांना धमकावून इक्बाल कासकर आणि त्याच्या साथीदारांनी एक फ्लॅट बळकावत मुमताज याच्या नावाने केला. सोबतच आरोपींच्या मागणीप्रमाणे मेहता यांनी त्यांना 10 लाख रुपयांचे चार धनादेश सुद्धा दिले होते. एका खात्याच्या माध्यमातून हे धनादेश वठवून रोखीने पैसे काढण्यात आल्याचे ईडीच्या तपासात समोर आले.

खात्यातून 10 लाख रुपये काढण्या व्यतिरिक्त कोणतेही व्यवहार झाले नव्हते. ही खाती कोण वापरत आहे हे सुद्धा लपवून ठेवण्यात आले. खात्यातून काढलेल्या रकमेची आरोपींनी उधळपट्टी केल्याचेही उघड झाले आहे. त्यामुळेच मुमताज याच्या नावावर घेण्यात आलेला फ्लॅट अखेर ईडीने जप्त केला.

SCROLL FOR NEXT