Latest

इस्लामपूर : पवार यांनी राष्ट्रवादीवर आरोप करणे बंद करावे

backup backup

इस्लामपूर; पुढारी वृत्तसेवा : शिवसेनेच्या माजी नगरसेविका प्रतिभा शिंदे यांच्या पतीवर जीवघेणा हल्ला झाल्यावर त्यांनी पोलिसांना काही नावे सांगितली. त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले, यात राष्ट्रवादी काँग्रेसचा संबंध येतो कुठे? मात्र कोणताही विषय असुद्या, त्यात राष्ट्रवादी व आ. जयंत पाटील यांच्यावर खोटे आरोप करून आपल्या नेत्यांची वाहवा मिळविण्याचा उद्योग शिवसेनेचे (शिंदे गट) जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांनी बंद करावा, अन्यथा यापुढे त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी पत्रकार बैठकीत दिला.

आनंदराव पवार यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन शिवकुमार शिंदे यांच्यावरील हल्ला प्रकरणात तालुकाध्यक्ष सागर मलगुंडे यांना गोवण्याचा राष्ट्रवादी प्रयत्न करीत असल्याचा आरोप केला होता.

शहराध्यक्ष शहाजी पाटील म्हणाले, या हल्ल्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. हा प्रकार दुर्दैवी आहे. लोकप्रतिनिधींच्या पतीवरच हल्ला होत असेल तर सामान्यांचे काय? कोणतेही प्रकरण असो राष्ट्रवादीचे नाव घेत मुख्य विषयाला बगल देण्याचा पवार यांचा प्रयत्न असतो. मात्र शहरातील जनता असल्या घाणेरड्या प्रकाराला थारा देणार नाही.

माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. चिमण डांगे म्हणाले, पालिका निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्या पायाखालची वाळू घसरायला लागली आहे. म्हणून ते राष्ट्रवादी व आमच्या नेत्यावर बेछूट आरोप करीत आहेत. मात्र शहरातील जनता या प्रकाराने विचलित होणार नाही. गेल्या अडीच वर्षात शहरात असा प्रकार घडला नाही. त्यामुळे पोलिसांनी दबाव न घेता हल्लेखोरांवर तातडीने कारवाई करावी. माजी नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी, अ‍ॅड. धैर्यशील पाटील, माजी उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, युवक राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सचिन कोळी, बाळासाहेब कोळेकर, मुकुंद कांबळे उपस्थित होते.

अपयश झाकण्यासाठी नामांतरणाचा मुद्दा…

शहाजीबापू पाटील म्हणाले, गेल्या 5 वर्षात काहीच भरीव काम करता न आल्याने जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी ईश्वरपूरचा विषय त्यांनी पुढे आणला. त्यांच्या जाहीरनाम्यात हा विषय कुठेच घेतला नव्हता. पाच वर्षात त्यांनी व त्यांच्या सहकार्‍यांनी तोंडातून त्याबद्दल एक ब्र शब्दही काढला नाही. मात्र नगरपालिकेची मुदत संपता-संपता त्यांनी हा विषय घेतला. जनतेच्या समोर जायला काहीतरी विषय पाहिजे, हे त्याचे मुख्य कारण होते. या शहरातील जनता गेल्या शेकडो वर्षांपासून गुण्यागोविंदाने एकत्र नांदतात, ते असल्या प्रकारांना थारा देणार नाही.

SCROLL FOR NEXT