तेल अवीव; पुढारी ऑनलाईन : इस्रायल च्या अशदोदमध्ये एक चकीत करणारे प्रकरण समोर आले आहे.
तिथे एका मुलीने जन्म घेतल्यावर तिच्या पोटात एकापेक्षा अधिक भ्रूण असल्याचे दिसून आले. आईच्या गर्भात ती या भ्रूणांचेही पालनपोषण करीत होती. आता तिच्यावर शस्त्रक्रिया करून हे भ्रूण काढून टाकण्यात आले आहेत.
पाच लाख नवजात बाळांपैकी एकात असे घडत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या मुलीचा जन्म जुलैच्या पहिल्या आठवड्यात अशदोदमधील अस्सुता मेडिकल सेंटरमध्ये झाला.
डॉक्टरांनी सांगितले की गर्भधारणेच्या शेवटच्या आठवड्यांमध्ये आईचे अल्ट्रासाऊंड केल्यावर गर्भातील बाळाचे पोट तुलनेने अधिक मोठे असल्याचे दिसून आले. तिचा जन्म झाल्यानंतर अल्ट्रासाऊंड आणि एक्स-रे चाचण्या करण्यात आल्या.
त्यावेळी तिच्या पोटात एकापेक्षा अधिक भ्रूण असल्याचे दिसून आले. अस्सुता मेडिकल सेंटरमधील नियोनेटोलॉजीचे संचालक ओमर ग्लोबस यांनी सांगितले की पोटात भ्रूण असल्याची पुष्टी झाल्यावर आम्ही चकीतच झालो.
या मुलीवर तातडीने शस्त्रक्रिया करून हे पोटातील भ्रूण काढण्यात आले. हे भ्रूण पूर्ण विकसित झाले नव्हते; पण त्यांच्यामधील हाडे व हृदय स्पष्ट दिसत होते. आता ही मुलगी व तिची आईही ठणठणीत असून त्यांना घरी पाठवण्यात आले आहे.
गर्भधारणेच्या सुरुवातीच्या टप्प्यात दोन भ्रूण म्हणजेच जुळे निर्माण होऊ शकतात. ते विकसित होण्याच्या टप्प्यात ते एकमेकांच्या शरीरातही वाढू शकतात. यामुळेच सयामी जुळे किंवा एका बाळाला अनेक डोकी, हात-पाय असे प्रकार घडतात.
या मुलीच्या शरीरात अन्य भ्रूण गेल्याने ही स्थिती झाली होती.