Latest

इसिस : आश्वासन स्वर्गाचे दिले; पण मी नरक अनुभवला

अमृता चौगुले

मूळ बांगला देशी तसेच ब्रिटिश नागरिक असलेली शमिमा बेगम ही इस्लामिक स्टेटमध्ये ( इसिस ) दाखल होण्यासाठी सीरियात आली. ती म्हणते, मला स्वर्गाचे आश्वासन देण्यात आले होते; पण मी सीरियात प्रत्यक्ष नरक अनुभवला. 'इसिस'कडून 'फिदायिन' (आत्मघातकी) हल्लेखोरांसाठी जॅकेट बनविण्याचे काम शमिमाकडे देण्यात आले होते. इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांसोबत ती राहिली. दरम्यान, तिला तीन मुले झाली; पण तिन्ही मरण पावली. उद्ध्वस्त सीरियात शरणार्थी शिबिरात दिवस कंठत असलेल्या शमिमाला ना तिचा देश (ब्रिटन) घ्यायला तयार आहे, ना तिचा मूळ देश (बांगला देश) तिला घ्यायला तयार आहे.

'घर की ना घाट की' अशी अवस्था असलेल्या शमिमाने पुन्हा एकदा ब्रिटनला पदरात घ्या म्हणून विनंती केली आहे. ब्रिटनने माझ्यावर खुशाल खटला चालवावा, असे शमिमाचे म्हणणे आहे. दुसरीकडे, शमिमासाठी ब्रिटनचे दरवाजे कायमचे बंद झालेले आहेत, असे ब्रिटिश सरकारने स्पष्ट केले आहे. 'स्काय न्यूज'ला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणते, 15 वर्षांची असताना मी ब्रिटन सोडले. तेव्हा मला काय कळत होते? वयाने ज्येष्ठ असलेल्या स्वजातीयांनी माझी दिशाभूल केली. मी या सर्व लोकांना ऑनलाईनच (इंटरनेटवर) भेटले होते. उभे आयुष्य मी तुरुंगात राहीन; पण ब्रिटनने मला पुन्हा नागरिकत्व द्यावे. शमिमाच्या म्हणण्यानुसार, 2015 मध्ये ती इतर दोन मुलींसोबत सीरियाला गेली होती. नंतर शमिमा थेट 2019 मध्ये सीरियातील निर्वासित शिबिरात आढळली. यावेळी ती 9 महिन्यांची गरोदर होती. मुलाचा न्युमोनियाने मृत्यू झाला. शमिमाला आधी दोन मुले होती; पण दोघांचाही मृत्यू झाला.

खादिजाचा मृत्यू, अमिरा बेपत्ता

'इसिस' दहशतवाद्याशी लग्नाव्यतिरिक्त मी काही चूक केलेली नाही, असे 22 वर्षीय शमिमा बेगम म्हणते. शमिमासोबत लंडनहून सीरियाला गेलेल्या खादिजा सुल्ताना आणि अमिरापैकी खादिजा ही एका बॉम्बहल्ल्यात मारली गेली. अमिराचे काय झाले ते कुणालाही कळलेले नाही.

  • आयुष्यभर तुुरुंगात ठेवा; पण ब्रिटनमध्ये येऊ द्या : बोरिस जॉन्सन सरकारला शमिमाचे साकडे
    ब्रिटनकडून स्पष्ट शब्दांत नकार; मूळ देश बांगला देशही अनुत्सुक; शरणार्थी शिबिरात दिवस कंठण्याची वेळ

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT