इचलकरंजी ; पुढारी वृत्तसेवा : इचलकरंजी शहरातील सामाजिक कार्यकर्ते सुरेश आण्णासो गडगे (वय 55) यांचा धारदार शस्त्राने मानेवर वार करून निर्घृण खून करण्यात आला. ही घटना मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास स्वामी अपार्टमेंट परिसरात घडली. पूर्ववैमनस्यातून खून झाल्याचा प्राथमिक अंदाज असला तरी नेमके कारण समजू शकले नाही. या घटनेमुळे शहरात खळबळ माजली असून, शिवाजीनगर पोलिस हल्लेखोराचा शोध घेत आहेत.
सुरेश गडगे हे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेप्रणित भ्रष्टाचार निर्मूलन संघटनेचे माजी अध्यक्ष, तर भ्रष्टाचारविरोधी जनक्रांती आघाडीचे संस्थापक-अध्यक्ष होते. स्वामी अपार्टमेंट येथे रात्री जेवण झाल्यानंतर ते नेहमीप्रमाणे मोकाट कुत्र्यांना घरासमोर बिस्किटे घालत होते, यावेळी हल्लेखोराने त्यांच्यावर हल्ला केला. मानेवर चाकूसारख्या धारदार शस्त्राने केलेला एकच वार वर्मी बसला. त्यामुळे गडगे जागीच कोसळले. ओरडण्याचा आवाज ऐकून त्यांच्या मुलासह नागरिकांनी धाव घेतली. त्यामुळे हल्लेखोराने तेथून पलायन केले.
गंभीर जखमी गडगे यांना तातडीने इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्यांनी स्पष्ट केले. घटनेनंतर गडगे यांच्या नातेवाईकांसह अनेकांनी रुग्णालयात धाव घेतली. घटनास्थळी शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी भेट देऊन पाहणी केली. पोलिस हल्लेखोराचा शोध घेत आहेत.