Latest

इचलकरंजी : चर्चा प्रकाश आवाडेंच्या प्रवेशाची अन् झटका राष्ट्रवादीला…

Arun Patil

इचलकरंजी, संदीप बिडकर : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा रविवारी कोल्हापुरात दौरा झाला. यावेळी इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे भाजपमध्ये प्रवेश करणार, अशी जोरदार राजकीय चर्चा रंगली होती. परंतु, सायंकाळी मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश पाटील हेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झाल्याची पक्की बातमी समजली. त्यामुळे दिवसभर चर्चा प्रकाश आवाडेंच्या प्रवेशाची; पण सायंकाळी दणका राष्ट्रवादीला बसल्याचे स्पष्ट झाले.

आ. प्रकाश आवाडे हे भाजपचे सहयोगी सदस्य आहेत. त्यांचा विधिमंडळामध्ये भाजपला पाठिंबा आहे. भाजपचे तत्कालीन आमदार सुरेश हाळवणकर यांचा पराभव करून 2019 मध्ये आवाडेे निवडून आले. त्यानंतर त्यांनी भाजपलाच पाठिंबा दिला. आवाडे वारंवार भाजपच्या नेत्यांच्या संपर्कात तसेच भाजपच्या जिल्ह्यातील काही कार्यक्रमांत सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या रविवारी कोल्हापूर दौर्‍यावेळी आ. प्रकाश आवाडे किंवा त्यांचे कुटुंबीय भाजपमध्ये प्रवेश करणार का? असा प्रश्न शहरवासीयांना पडला होता. याची जोरदार चर्चा कार्यकर्त्यांमध्ये होती. परंतु, गृहमंत्र्यांच्या कार्यक्रमपत्रिकेमध्ये इचलकरंजी परिसरात त्यांचा कार्यक्रम नसल्यामुळे या चर्चा धूसर होत गेल्या. परंतु, दुपारी गृहमंत्र्यांचा कार्यक्रम सुरू झाल्यानंतर आ. प्रकाश आवाडे यांचा कुटुंबीयांसह भाजपमध्ये प्रवेश, असे वृत्त पसरले. त्यामुळे आवाडे यांच्या ताराराणी पक्ष कार्यकर्त्यांमध्ये भ—मणध्वनीद्वारे विचारणा होऊ लागल्या. त्याचबरोबर शहरातील भाजपच्या कार्यकर्त्यांनीही आपल्या वरिष्ठांना भ—मणध्वनी करून या वृत्ताची चाचपणी करण्यास सुरुवात झाली. शहरातील दैनिकांमध्येही कार्यकर्त्यांनी फोन करून या वृत्ताची खातरजमा करण्यास सुरुवात झाली.

सायंकाळच्या वेळी गृहमंत्री अमित शहा मुख्य कार्यक्रम संपवून दुसर्‍या कार्यक्रमासाठी गेले. त्यावेळी याचा उलगडा झाला. आ. प्रकाश आवाडे हे भाजप सहयोगी म्हणून व्यासपीठावर उपस्थित होते. परंतु, त्यांनी अधिकृत प्रवेश केला नाही. तसेच त्यांनी कुटुंबीयांसह अमित शहा यांचा सत्कार केला, एवढ्यापुरता हा कार्यक्रम मर्यादित राहिला. दुसरीकडे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही दौरा कोल्हापूरमध्ये झाला. त्यांच्या कार्यक्रमात मात्र इचलकरंजीतील राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रकाश पाटील यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. त्यांच्याबरोबर राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका अनिता कांबळे व शहर सरचिटणीस बाजीराव कुंभार यांनीही राष्ट्रवादीला रामराम ठोकला. त्यामुळे सायंकाळच्या वेळेस शहरामध्ये चर्चा आ. प्रकाश आवाडे यांच्या प्रवेशाची व दणका बसला राष्ट्रवादीला, अशी खुमासदार चर्चा रंगू लागली.

SCROLL FOR NEXT