इंडिगो कंपनीच्या कोल्हापूर-अहमदाबाद विमानसेवेला मंगळवारपासून नागपूर कनेक्टिव्हिटी सुरू झाली. सकाळी दहा वाजता अहमदाबादवरून आलेल्या विमानातून 46 प्रवासी आले, तर कोल्हापूरहून अहमदाबादला 51 प्रवासी रवाना झाले. यातील आठ प्रवासी नागपूरला जाणार होते.
या कनेक्टिव्हिटीमुळे राज्याची उपराजधानी असलेले नागपूर शहर कोल्हापूरपासून अवघ्या चार तासांच्या अंतरावर आले आहे. येत्या काही दिवसांत नागपूर कनेक्टिव्हिटी न राहता कोल्हापूर-नागपूर थेट विमानसेवा सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, अशी माहिती विमानतळ संचालक कमलकुमार कटारिया यांनी दिली. सकाळी 10 वा. 30 मिनिटांनी विमान अहमदाबाद, नागपूरसाठी 51 प्रवासी घेऊन रवाना झाले.
कोल्हापूर हे अहमदाबाद, हैदराबाद, मुंबई, तिरुपती, बंगळूर या देशातील पाच प्रमुख शहरांना विमानसेवेच्या माध्यमातून जोडले आहे. या पाच प्रमुख शहरांबरोबरच सहावे नागपूर शहरही या कनेक्टिव्हिटीमुळे आजपासून जोडले आहे. मंगळवार, गुरुवार, शनिवार अशी आठवड्यातून तीन दिवस ही सेवा सुरू राहणार आहे .