Latest

इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग एक उत्तम पर्याय

Arun Patil

तुमच्याकडे नैसर्गिकरीत्या प्रश्न सोडविण्याची हातोटी असेल तर इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग शाखा तुमची क्षमता वापरण्यासाठी योग्य ठरू शकते. करिअर म्हणून इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग हा एक उत्तम पर्याय मानला जातो.

इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग म्हणजे अशी शाखा की, गुंतागुंतीची प्रक्रिया पार पाडण्याचे नियोजन करू शकते. पैशाचा अपव्यय, वेळ, साहित्य, मनुष्यबळ, मशिनला लागणारा वेळ, ऊर्जा आणि अन्य स्रोतांचा ताळमेळ साधण्याचे काम इंडस्ट्रियल इंजिनिअरला करावे लागते.
इंडस्ट्रियल इंजिनिअर हा उत्पादन क्षमता आणि दर्जा वाढविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असतो आणि त्यासाठी नियोजन, आखणी व रचना करत असतो.

संख्याशास्त्राचे विश्लेषण, रचना, नियोजन, क्वालिटी कंट्रोल, अंमलबजावणी व्यवस्थापन, संगणक व्यवस्थापन या आधारावर उत्पादनाची प्रक्रिया पद्धतशीरपणे कशी पार पाडली जाईल, याकडे लक्ष देत असतो. कारखान्याची किंवा प्रकल्पाची उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी संशोधन करत असतो. उत्पादन क्षमतांवर परिणाम करणारे घटक बाजूला काढून त्यात सुधारणा कशी करता येईल, यासाठी तो प्रयत्न करत असतो.

कारखान्यातील एखाद्या उत्पादनासाठी वापरण्यात येणार्‍या मशिनची देखभाल करणे आणि गरजेनुसार त्याचा वापर कसा करता येईल, याचे नियोजन इंडस्ट्रियल इंजिनिअर करत असतो. बड्या कंपन्यांत अशा इंजिनिअरची कायम गरज असते. देशात आणि परदेशात अशा इंजिनिअरची नेहमीच मागणी राहिलेली आहे.

पात्रता : इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगमध्ये चांगले करिअर करण्यासाठी सायन्स असणे गरजेचे आहे. फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिकमध्ये चांगले गुण असणे आवश्यक आहे; जेणेकरून या क्षेत्राचे फाऊंडेशन चांगले होईल आणि ही शाखा समजणे अधिक सोपे जाऊ शकते. गणित आणि शास्त्र विषयात पारंगत असलेला विद्यार्थी या क्षेत्रात उत्तम करिअर करू शकतो. विशेषत: कॅलक्युलस, मटेरियल्स, मेटल्स, फिजिक्स, स्टॅटेटिक्स आणि नॉन मेटल्सवर अधिक भर देणे आवश्यक आहे.

परीक्षेचे स्वरूप : जेईई मेन्ससारखी परीक्षा उत्तीर्ण केल्यास इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगसारख्या शाखेला प्रवेश मिळू शकतो. त्याचबरोबर बारावीला सायन्समध्येही विशेष प्रावीण्य – त्यातही मॅथ्स, फिजिक्समध्ये असणे गरजेचे आहे. अन्य राज्यांच्या प्रवेश परीक्षा देऊन तसेच आयआयटीची प्रवेश परीक्षा देऊन या शाखेची निवड करू शकतो. आयआयटीसाठी दोन-तीन वर्षे अगोदरच तयारी सुरू करावी लागते. तसेच अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेची तयारीदेखील वर्षभरापासून करावी लागते. आपल्या गुणांनुसार औद्योगिक अभियांत्रिकी (इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग) करता येते.

अभ्यासक्रमांचे स्वरूप : अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगमध्ये बी.टेक. किंवा बी.एस्सी. किंवा बी.एस. पदवी घेऊ शकतो. त्यात काही विशेष विषयांचा समावेश असतो. स्टॅटास्टिकल कंट्रोल, क्वालिटी अ‍ॅश्युरन्स, सप्लाय चेन मॅनेजमेंट आणि ऑपरेशन्सचा समावेश असतो. या शाखेत पदवी घेतल्यानंतर पदव्युत्तर पदवीही विद्यार्थ्याला घेता येते. इकॉनॉमिक्स ऑफ प्रॉडक्शन आणि बिझनेस इफिशियन्ससारख्या विषयात मास्टर पदवी घेता येते.

शैक्षणिक संस्था : आयआयटी, दिल्ली, गीतम युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी, हैदराबाद, वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (व्हीआयटी), वेल्लोर, मणिपाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कर्नाटक.

श्रीकांत देवळे

SCROLL FOR NEXT