Latest

इंग्रजी येत नसल्याने बाबर ब्रँड बनला नाही : शोएब अख्तर

Arun Patil

कराची, वृत्तसंस्था : पाकिस्तानचा दिग्गज वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने कर्णधार बाबर आझमच्या संभाषण कौशल्यावर टीका केली आहे. शोएब अख्तर म्हणाला की, बाबर इंग्रजी बोलू शकत नसल्याने तो मोठा ब्रँड बनू शकला नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान गोलंदाजीचा विक्रम करणार्‍या 47 वर्षीय वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने सांगितले की, क्रिकेट खेळणे एक गोष्ट आहे आणि मीडिया हाताळणे ही दुसरी गोष्ट आहे. जर बाबर बोलू शकत नसेल, तर तो व्यक्त होऊ शकणार नाही.

एका स्थानिक पाकिस्तानी चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत शोएब अख्तरने बाबरसह पाकिस्तानी खेळाडूंच्या संवाद कौशल्यावर टीका केली. तो म्हणाला, तुम्हीच बघा, संघात शिष्टाचार नाही, त्यांना कसे बोलावे हेही कळत नाही. ते बोलायला आले की, किती विचित्र वाटते. इंग्रजी शिकणे आणि बोलणे कठीण आहे का? क्रिकेट मीडिया हाताळणे हे एक काम आहे. तुम्ही बोलू शकत नसाल, तर तुम्ही टी.व्ही.वर व्यक्त होऊ शकणार नाही.

शोएब अख्तर म्हणाला, मला उघडपणे सांगायचे आहे की, बाबर आझम हा पाकिस्तानमधील सर्वात मोठा ब्रँड असावा; पण तो पाकिस्तानमधील सर्वात मोठा ब्रँड का बनला नाही? कारण त्याला बोलता येत नाही. अख्तरच्या मते, वसीम अक्रम आणि शाहिद आफ्रिदी यांच्यासारख्या माजी दिग्गजांसह जाहिरातींसाठी सध्याच्या क्रिकेटपटूंपेक्षा त्यांना प्राधान्य दिले जाते. याच्यामागचे एकमेव कारण म्हणजे त्याचे संवाद कौशल्य आहे. बाबर आझमला याआधीही त्याच्या संवाद कौशल्यामुळे टीकेला सामोरे जावे लागले आहे.

SCROLL FOR NEXT