Latest

आर्मीमध्ये भरतीच्या आमिषाने फसवणूक, तिघांना अटक

Arun Patil

पिंपरी ; पुढारी वृत्तसेवा : आर्मीमध्ये बॉर्डर रोडस ऑर्गनायझेशन (जीआरईएफ) मध्ये व्हेईकल मॅकॅनिक या पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तिघांनी दोन तरुणांकडून हजारो रुपये घेतले. तरुण आर्मी भरतीसाठी आले असता आर्मी इंटेलिजन्सच्या ही बाब लक्षात आली. आर्मी इंटेलिजन्सने संशयित तरुणांना पकडून पोलिसांकडे दिले. त्यानंतर पोलिसांनी आर्मीमधील एकासह तिघांना अटक केली आहे.

सतीश कुंडलिक डहाणे (४०, रा. औंध मिलिटरी कॅम्प, पुणे), श्रीराम बनाजी कदम, अक्षय देवलाल वानखेडे (रा. तेल्हारा, ता. तेल्हारा, जि. अकोला) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी गजानन पुरुषोत्तम मिसाळ (२३, रा. भातकुली, ता. भातकुली, जि. अमरावती) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे अमरावती येथील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अमरावती विभागात मोटार मेकॅनिक पदावर कार्यरत आहेत. फिर्यादी व त्यांचे मित्र धनंजय वट्टमवार यांना आरोपी अक्षय वानखेडे याने बॉर्डर रोडस ऑर्गनायझेशन (जीआरईएफ) या आर्मीच्या भरतीमध्ये व्हेईकल मॅकॅनिक या पदासाठी नोकरीस लावतो असे आमिष दाखवले. हे काम आरोपी सतीश डहाणे याच्या सांगण्यावरून करत असल्याचे अक्षय याने सांगितले.

त्यानुसार, फिर्यादी व त्यांच्या मित्राकडून भरतीसाठी ७० हजार रुपये घेतले. दरम्यान, ४ जानेवारी २०२२ रोजी दुपारी तीनच्या सुमारास फिर्यादी व त्यांचे मित्र धंनजय वट्टमवार (वय २१), निलेश ईश्वर निकम (२३, रा. मु पो आगार खुर्द, ता. मालेगाव, जि. नाशिक), अक्षय बाळु सांळुखे (२५, रा. खेडगाव, ता. चाळीसगाव, जि. जळगाव) हे रक्षक चौक औध मिलिटरी कॅम्पच्या समोर भरतीसाठी आले.

या प्रकरणाची मिलिटरी इंटेलिजन्सला कुणकुण लागली. मिलिटरी इंटेलिजन्सने फिर्यादी आणि त्यांच्या मित्रांना ताब्यात घेतले. त्यांना सांगवी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले. पोलिसांनी तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले.

त्यांच्याकडून आर्मी भरतीसाठी लागणारी कागदपत्रे, रोख रककम, कॉम्प्युटर, पेन ड्राइव्ह, दोन दुस-याच्या नावे असलेले रबरी शिक्के, मिलिटरीचे स्वतःचे बनावट ओळखपत्र, वेगवेगळी बनावट एनव्हलप, कमांडट ग्रेफ सेंटर यांचे ॲकनॉलेज कार्ड, बी आर ओ चे भरतीचे अॅडव्हटाईज नंबर, उमेदवारांचे भरलेले फॉर्म, इत्यादी कागदपपत्रे, तसेच उमेदवांराशी शैक्षणिक पात्रतेची झेरॉक्स प्रमाणपत्र, आधार कार्ड, पॅनकार्ड व आटीलरी नाशिक रोड कॅम्प यांचे अॅप्लीकेशन फॉर्म इत्यादी ताब्यात घेण्यात आले आहेत. आरोपींच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगवी पोलीस याचा तपास करीत आहेत.

SCROLL FOR NEXT