Latest

आर्थिक विकासाचे लक्ष्य गाठण्यासाठी सज्ज व्हा; पंतप्रधान मोदींचे तरुणांना आवाहन

दिनेश चोरगे

हुबळी; पुढारी वृत्तसेवा :  जगामध्ये सर्वाधिक युवाशक्ती भारतात आहे. देशाचा विकास, रक्षणामध्ये युवा पिढीची भूमिका मोठी आहे. युवा शक्ती देशाचे लक्ष्य ठरवते. जगामध्ये पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था भारताची आहे. या बाबतीत तिसरा क्रमांक मिळवण्यासाठी सज्ज व्हायचे आहे. धावपट्टी तयार आहे. युवाशक्तीने उड्डाण घेण्याची तयारी करावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

गुरुवारी येथील रेल्वे स्पोर्टस् ग्राऊंडवर आयोजित राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. ते म्हणाले, हे शतक भारताचे आहे. येथील युवा पिढीचे आहे. इतिहासात या शतकाची नोंद वैशिष्ट्यपूर्ण होणार आहे. अशा शतकावर प्रभाव पाडण्याची शक्ती युवा पिढीमध्ये आहे. स्वामी विवेकानंदांनी 'उठा, जागे व्हा, लक्ष्य गाठेपर्यंत गप्प बसू नका,' असा संदेश दिला होता. हा संदेश आजच्या युवाशक्तीमध्ये दिसून येतो. स्वामी विवेकानंदांची कर्नाटकशी जवळीक होती. हुबळी, धारवाडमध्येही ते आले होते. म्हैसूरच्या राजांनी त्यांना विदेश यात्रेसाठी मदत केली होती. 'एक भारत, श्रेष्ठ भारत' या संकल्पनेने देश पुढे जात असल्याचे त्यांनी सांगितले.

देशातील नारीशक्ती ही राष्ट्रशक्ती म्हणून परिचित होत आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात मुली मागे राहिलेल्या नाहीत. एकविसावे शतक हे भारताचे असल्याचे दाखवून देण्याची वेळ आली आहे. आधुनिक जगात आपण मागे नाही, हे दाखवून द्यायचे असेल; तर दहा पाऊल पुढे जाऊन विचार करण्याची गरज आहे. शिक्षणापासून सुरक्षा, आरोग्यापासून संपर्क व्यवस्थेपर्यंत सर्वच क्षेत्रांत आज तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. युवा पिढीने भविष्यात कौशल्य आत्मसात करावे. त्या द़ृष्टीने देशात नवे शिक्षण धोरण अस्तित्वात आणण्यात येत असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT