Latest

आमदार गणेश नाईक यांना विमानतळावर रोखणार

Arun Patil

नवी मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : भाजपचे आमदार गणेश नाईक यांच्याविरुद्ध बलात्कार व ठार मारण्याची धमकी दिल्याच्या एका महिलेच्या तक्रारीवरून नवी मुंबईतील नेरुळ आणि सीबीडी पोलीस ठाण्यांत दोन गुन्हे दाखल झाले आहेत. न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर आ. नाईक परदेशात जाऊ नयेत, यासाठी पोलिसांनी विमानतळ प्रशासनाला पत्र दिले आहे.

ठाणे सत्र न्यायालयाने 27 एप्रिलला अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यामुळे भाजपचे आमदार गणेश नाईक यांचा नेरुळ पोलीस शोध घेत आहेत. पोलिसांनी नवी मुंबई ते मुरबाड, अलिबाग ते मुंबई आणि राज्यातील अन्य ठिकाणी शोध घेऊनही आतापर्यंत आ. नाईक यांचा ठावठिकाणा लागलेला नाही. दरम्यान, आ. नाईक यांनी परदेशी जाऊ नये, यासाठी नेरुळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक आणि तपास अधिकारी श्याम शिंदे यांनी 26 एप्रिललाच मुंबई विमानतळ प्रशासनाला पत्र दिले.

आमदार नाईक मुंबई विमानतळावर आल्यास तत्काळ तपास अधिकार्‍यांना कळवण्याची सूचना या पत्रात दिली असून, तपास अधिकार्‍यांचे नाव, संपर्क क्रमांक, पोलीस ठाण्याचा तपशील देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पूर्णत: कोंडी झालेले आ. नाईक दोन-तीन दिवसांत उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज करतील, अशी दाट शक्यता आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. दररोज एक पथक आ. नाईक यांचा शोध घेत असून, विमानतळ प्रशासनाला पत्र दिले आहे, असे पोनि शिंदे यांनी सांगितले.

SCROLL FOR NEXT