लंडन : दीर्घायुष्यी बनणे आणि नेहमी तरुण दिसणे या दोन गोष्टींची माणसाला नेहमीच इच्छा असते. त्यादृष्टीने संशोधनेही होतच असतात. आता वैज्ञानिकांनी एक असे तंत्र विकसित केले आहे ज्यामुळे माणूस वयाच्या साठाव्या वर्षीही तीस वर्षांचा वाटेल! शरीराच्या ज्या भागात या तंत्राचा वापर केला जाईल तो भाग किंवा अवयव तरुण वयातील शरीराप्रमाणे काम करेल.
इंग्लंडच्या बाब्राहम इन्स्टिट्यूटच्या वैज्ञानिकांनी या तंत्राला 'टाईम जंप' असे नाव दिले आहे. या तंत्रामुळे माणूस साठाव्या वर्षीही तिशीतील माणसासारखा दिसू शकेल असा वैज्ञानिकांचा दावा आहे. इन्स्टिट्यूटमध्ये वैज्ञानिक एपिजेनेटिक्स रिसर्च प्रोग्रॅम चालवत आहेत. त्यामध्ये जुन्या पेशींना पुन्हा 'रीस्टोअर' करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. मॉलिक्यूलर स्तरावर म्हणजेच अगदी रेणूंच्या स्तरावर या पेशी आपले जैविक वय टिकवून ठेवू शकतील यासाठीचा हा प्रयत्न आहे. याबाबतच्या संशोधनाची माहिती
'ई-लाईफ' या नियतकालिकात देण्यात आली आहे. अर्थात हे संशोधन सध्या पहिल्याच टप्प्यात आहे. मात्र, हे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. त्याच्या मदतीने भविष्यात वाढत्या वयाचे दुष्परिणाम रोखणारे औषध किंवा उपचारपद्धती विकसित होऊ शकेल. वाढत्या वयाबरोबर आपल्या पेशींची काम करण्याची क्षमताही कमी होत जाते तसेच जिनोमही कमजोर होऊ लागतात. 'रीजनरेटिव्ह बायोलॉजी'मध्ये जुन्या पेशींची जागा नव्या पेशींनी घेणे आणि जुन्या पेशींना ठीक करणे हे काम केले जाते.