Latest

आता रोबो घेणार पिकांची काळजी! शेतकऱ्यांना होणार फायदा

Arun Patil

कानपूर : पिकांवरील रोग तसेच मातीमधील पोषक घटकांचा छडा लावण्यासाठी आता आयआयटीच्या सहयोगाने चंद्रशेखर आझाद कृषी व तंत्रज्ञान विद्यापीठातील (सीएसएस) संशोधकांकडून एक विशेष रोबो विकसित केला जात आहे. हा रोबो शेतात रिमोटच्या माध्यमातून चालवल्यावर त्यामधील सेन्सर प्रणाली विभिन्‍न मानकांवर माती आणि पिकांची तपासणी करील. चाचणीनंतर येत्या दोन महिन्यांमध्येच हा रोबो लाँच करण्याची तयारी करण्यात आली आहे. त्यानंतर शेतकरी या रोबोचा लाभ घेऊ शकतील.

'सीएसए'चे कुलपती डॉ. डी. आर. सिंह यांनी म्हटले आहे की वेगवेगळ्या वातावरणात पिकांवर अनेक प्रकारचे रोग निर्माण होण्याचा धोका संभवत असतो. त्यांच्यावर वेगवेगळ्या रसायनांचा फवारा मारावा लागतो. मात्र, कोणत्या पिकावर कधी, कोणता रोग पडू शकतो याची माहिती मिळवण्यात उशीर लागतो.

ही समस्या दूर करण्यासाठी आयआयटीच्या मदतीने सेन्सर प्रणालीवर आधारित या रोबोची निर्मिती केली जात आहे. रोबोमध्ये बसवण्यात आलेले सेन्सर मातीच्या कणांमधील नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, कार्बनिक कार्बन, कॅटियन एक्सचेंज कपॅसिटी आदी पोषक तत्त्वांचे प्रमाण शोधू शकतात. रोपे आणि पानांची छायाचित्रे टिपून त्याच्या आधारे रोगांचे पूर्वानुमान लावले जाऊ शकेल.

त्यामुळे शेतकरी वेळीच सावध होऊन योग्य उपाययोजना करू शकतील. आधीच संबंधित रोगांवरील औषधांचा फवारा पिकांवर करता येईल. सध्या या रोबोची आयआयटीकडून चाचणी सुरू आहे. अशा प्रकारचे दोन रोबो विकसित करण्यात आले आहेत. त्यापैकी एका रोबोची उंची सुमारे दीड फूट असून दुसर्‍याची उंची तीन ते चार फूट आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT