Latest

आता डेंटिस्टही करू शकणार हेअर ट्रान्स्प्लांट

Arun Patil

नागपूर, वृत्तसंस्था : रुट कॅनॉल, दंतरोपण आदी महत्त्वाची प्रक्रिया करणार्‍या डेंटिस्ट मंडळींना आता केशरोपण म्हणजेच हेअर ट्रान्स्प्लांट आणि चेहर्‍याशी संबंधित सौंदर्य शस्त्रक्रिया करता येणार आहेत. डेंटल कौन्सिल ऑफ इंडियाने याबाबत नुकतीच मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. महाराष्ट्र डेंटल कौन्सिलला ही मार्गदर्शक तत्त्वे प्राप्त झाली असून ती राज्यभरातील दंतवैद्यकांना पाठवण्यात आली आहेत.

याबाबत डेंटल कौन्सिलच्या पदाधिकार्‍यांनी सांगितले की, दातांवरील उपचारांशिवाय हेअर ट्रान्स्प्लांट सुविधा लवकरच शासकीय व खासगी डेंटल क्लिनीकमध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहेत. या निर्णयामुळे हेअर ट्रान्स्प्लांट उद्योगाला चालना मिळणार आहे.

डेंटिस्ट आणि चेहर्‍याशी संबंधित शस्त्रक्रिया करणारे मॅक्सीलोफेशियल सर्जन यांच्यासाठी ही एक मोठी संधी असणार आहे. डेंटल कौन्सिल ऑफ इंडियाने इच्छुक डॉक्टरांना प्रशिक्षण व इतर सुविधा उपलब्ध करून घेण्यास सांगितले आहे. यामुळे देशात हेअर ट्रान्स्प्लांट सर्जनची संख्या वाढणार आहे असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

मॅक्सीलोफेशियल सर्जन महत्त्वाचे

राज्याच्या डेंटल कौन्सिलच्या पदाधिकार्‍यांच्या मते शासकीय दंत रुग्णालयांत ही सुविधा सुरू करण्यासाठी आणखी थोडा कालावधी लागणार आहे. सध्या फक्त प्लास्टिक सर्जन आणि त्वचारोग तज्ज्ञांनाच हेअर ट्रान्स्प्लांट करण्याची परवानगी देण्यात आली आहे. पण मॅक्सीलोफेशियल सर्जन हे दात व जबड्यासह संपूर्ण चेहर्‍यावर शस्त्रक्रिया करू शकत असल्याने त्यांना हेअर ट्रान्स्प्लांटची परवानगी देणे अधिक फायदेशीर आणि सुयोग्य आहे.

सध्या बोगस तज्ज्ञांचा सुळसुळाट

सध्याच्या काळात विविध कारणांमुळे खासकरून जीवन शैलीतील बदलांमुळे टक्कल पडण्याचे प्रमाण तरुणांमध्येही वाढत आहे. अशा स्थितीत तज्ज्ञ व प्रशिक्षित हेअर ट्रान्स्प्लांट तज्ज्ञांची मोठ्या प्रमाणावर गरज आहे. या तुटवड्याचा फायदा घेत देशात बोगस हेअर ट्रान्स्प्लांट करणार्‍यांचे रॅकेटच सुरू असल्याकडे तज्ज्ञांनी बोट दाखवले.

डेंटल कौन्सिल ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये डेंटिस्ट मंडळींनी कोणते प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे व रुग्णालयात कोणत्या सुविधा आवश्यक आहेत याची महिती दिली आहे.

हेअर ट्रान्स्प्लांटची बाजारपेठ अब्जावधींची

केशरोपण क्षेत्रातील माहितीनुसार जगात 2021 पर्यंत हेअर ट्रान्स्प्लांटच्या बाजारपेठेत 4.8 अब्ज डॉलर्सची उलाढाल झाली होती. 2028 पर्यंत हेअर ट्रान्स्प्लांटची बाजारपेठ 30 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. भारतातही या उपचारांची मागणी झपाट्याने वाढत असून हे क्षेत्र दरवर्षी 25 ते 30 टक्क्यांनी वाढत आहे. सध्या चार महानगरे व त्यानंतरची मोठी शहरे येथे या उपचारांना अधिक मागणी असल्याचे एका सर्वेक्षणात समोर आले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT