न्यूयॉर्क : व्यायाम करणे हे आरोग्यासाठी तसेच दीर्घायुष्यासाठी लाभदायक असते. मात्र, अनेक लोकांना वेळेअभावी, इच्छा असूनही व्यायाम करता येत नाही. आता अशा लोकांसाठी एक दिलासादायक वृत्त आहे. रोज व्यायाम करणे शक्य होत नसले तरी केवळ वीकेंडचा म्हणजेच आठवड्यातील शेवटच्या दोन दिवसांचा व्यायामही लाभदायक ठरू शकतो.
अमेरिकेतील नॅशनल हेल्थ इंटरव्ह्यू सर्व्हेने 1997 ते 2013 दरम्यान 3.5 लाखांपेक्षाही अधिक लोकांचा डेटा एकत्र केला. ब—ाझीलच्या फेडरल युनिव्हर्सिटीच्या एक्सरसाईज फिजियोलॉजी रिसर्चर्सनी यामधून हाच निष्कर्ष काढला की तुम्ही रोज व्यायाम केला किंवा आठवड्यातून दोन दिवस केला तरी तुम्ही व्यायाम न करणार्या लोकांपेक्षा जास्तच जगता!
या संशोधनाच्या लेखिका माउरिसिओ डोज सांटोस यांनी सांगितले की रोज मध्यम ते कठोर व्यायाम करणार्या आणि आठवड्याच्या अखेरीस व्यायाम करणार्या लोकांच्या आरोग्यामध्ये अतिशय कमी अंतर असल्याचे आम्हाला आढळून आले. दोन्ही प्रकारच्या लोकांमध्ये सर्व कारणांमुळे मृत्यूची जोखिम, विशेषतः कर्करोग आणि हृदयविकारामुळे होणार्या मृत्यूची जोखिम कमी असल्याचे दिसून आले.
समान प्रमाणाच्या शारीरिक हालचाली अधिक दिवसांमध्ये केल्या किंवा काही मर्यादित दिवसांमध्ये केल्या तरी काही फरक पडत नाही. त्यामुळे मृत्यूदर प्रभावित होत नाही. याबाबतीत चिंता करण्याऐवजी आपण आठवड्यातून आपण ठरवलेल्या वेळी व्यायाम करावा. या व्यायामाचे परिणाम ठळकपणे समोर येतातच. जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शिकेनुसार प्रौढ व्यक्तीस दर आठवड्यात 150 ते 300 मिनिटांची मध्यम शारीरिक हालचाल किंवा 75 ते 150 मिनिटांचा कठोर व्यायाम गरजेचा आहे.