Latest

आ. मकरंद पाटील किसनवीर कारखान्याचे चेअरमन

Arun Patil

वाई/कवठे ; पुढारी वृत्तसेवा : किसन वीर सातारा सहकारी कारखान्याच्या चेअरमनपदी अखेर आ. मकरंद पाटील यांच्याच नावावर शिक्‍कामोर्तब झाले. व्हा. चेअरमनपदी प्रमोद शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी जल्‍लोष केला.

किसन वीर कारखान्याच्या चेअरमन व व्हा. चेअरमन निवडीबाबत प्रचंड उत्सुकता लागून राहिली होती. या निवडीच्या पार्श्‍वभूमीवर आ. मकरंद पाटील व नितीनकाका पाटील यांनी नूतन संचालक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली होती. त्याचबरोबर निवडीच्या पूर्वसंध्येला सातारा जिल्हा बँकेत विधान परिषद सभापती ना. रामराजे ना. निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीला स्वत: मकरंदआबा, आ. शिवेंद्रराजे भोसले, प्रभाकर घार्गे, नितीनकाका पाटील व नूतन संचालक हजर होते.

किसनवीर कारखाना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी शेतकर्‍यांकडून भागभांडवल जमा करावे लागणार आहे. तसेच अवघ्या चारच महिन्यात कारखाना सुरू करण्याचे आव्हान नव्या संचालक मंडळासमोर आहे. त्यामुळे जबाबदारी असलेल्या चेअरमनपदी कोण असावे यावर जिल्हा बँकेत चर्चा झाली. यामध्ये पाटील बंधूपैकी कोणाची तरी एकाची निवड करावी यावर चर्चा झाली.

तसेच या दोघांव्यतिरिक्‍त अन्य संचालकास चेअरमन केल्यास काय होईल, यावरही चर्चा झाली होती. ना. रामराजे ना. निंबाळकर यांनी दिलेल्या नावाचाच चेअरमन होईल, अशी भूमिका संचालक मंडळाने मांडली होती. त्यानंतर मंगळवारी रामराजेंनी आ. मकरंद पाटील यांचे नाव चेअरमनपदी सुचवले. मात्र, रात्री उशिरापर्यंत याची माहिती कोणालाही देण्यात आली नव्हती.

मंगळवारी सकाळी 11 वाजता किसनवीर कारखान्यात नूतन संचालक मंडळाची बैठक झाली. या बैठकीत चेअरमनपदासाठी आ. मकरंद पाटील व व्हा. चेअरमनपदासाठी प्रमोद शिंदे यांनी अर्ज दाखल केले. या दोघांचेच अर्ज आल्याने उपनिबंधक मनोहर माळी यांनी या निवडी बिनविरोध झाल्याचे घोषित केले. या निवडी झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्‍लोष केला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT