Latest

अ‍ॅलन मस्क यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप

Arun Patil

वॉशिंग्टन ; वृत्तसंस्था : स्पेसएक्स आणि टेस्लाचे सीईओ अ‍ॅलन मस्क यांच्यावर एका फ्लाईट अटेंडंटने लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. 2016 मध्ये हा प्रकार घडला होता. तो दडपण्यासाठी स्पेसएक्सने अडीच लाख डॉलर्स (1.93 कोटी) पीडित महिलेला दिल्याची माहितीही समोर आली आहे.

बिझनेस इनसाइडरने दिलेल्या वृत्तानुसार, संबंधित महिला स्पेसएक्सच्या जेट विमानात फ्लाईट अटेंडंट म्हणून कार्यरत होती. मस्क यांनी या महिलेला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करीत शरीरसुखाची मागणी केली होती. एरॉटिक मसाज देतेस का, अशी विचारणाही त्यांनी तिच्याकडे केली होती. या बदल्यात एक घोडा भेट म्हणून देण्याची तयारीही मस्क यांनी दाखविली होती. कारण त्या महिलेला घोडेस्वारीची आवड होती.

या फ्लाईट अटेंडंट महिलेच्या एका मैत्रिणीची मुलाखत आणि कागदपत्रांच्या आधारे हा दावा करण्यात आला आहे. मात्र, या महिलेने असे करण्यास नकार दिला होता. त्यानंतर हे प्रकरण दडपण्यासाठी 2018 मध्ये महिलेला स्पेसएक्सतर्फे अडीच लाख डॉलर्स अदा करण्यात आले होेते.

मस्क यांच्याकडून इन्कार

अ‍ॅलन मस्क यांनी मात्र असे काही घडले नसल्याचे म्हटले आहे. या प्रकरणाचे अनेक पैलू असू शकतात, जे अद्याप समोर आलेले नाहीत. याकडे राजकीय द़ृष्टिकोनातून पाहू शकता. मी असे काही करीत असतो, तर 30 वर्षांत अशा अनेक घटना समोर आल्या असत्या, असेही ते म्हणाले. दरम्यान, 2021 मध्ये मस्क यांनी 'माझ्याशी संंबंधित कोणते स्कँडल समोर आले, तर त्याला एलनगेट असे म्हणा', असे उपरोधित ट्विटही केले होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT