कुर्ला ; पुढारी वार्ताहर : स्टेट ट्रान्सपोर्ट को.बँक लिमिटेड या एसटीच्या कर्मचार्यांनी उभ्या केलेल्या बँकेच्या कार्यकारिणी निवडणुकीत आता अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी उडी घेतली असून, बँकेवर राज्य करणार्या राष्ट्रवादी काँग्रेसला शह देण्याची तयारी सुरू केली आहे.
रविवारी माध्यमांशी बोलताना अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी ही घोषणा केली. मात्र, प्रत्यक्ष निवडणूक लढवण्याचा तपशील ते सोमवारी जाहीर करणार आहेत. सदावर्ते एसटी बँकेच्या निवडणुकीत पॅनल उभे करणार असल्याचे समजताच रविवारी राज्याच्या विविध भागांतून एसटी कर्मचारी त्यांच्या भेटीला मुंबईत आले. त्यांना पुष्पहार घालून या कर्मचार्यांनी त्यांना पाठिंबा दर्शवला.
एसटी बँकेचे राज्यात तब्बल
90 हजार मतदार आहेत. तब्बल 2 हजार कोटींहून अधिक ठेवी असलेल्या एसटी बँकेच्या राज्यात 50 शाखा आहेत. सध्या या बँकेचे 90 हजार सदस्य असले तरी थकबाकीमुळे यातील 60 हजार मतदारांना मतदान करणे अवघड होणार आहे. मात्र सदावर्ते यांनी हे घटनेच्या विरोधात असल्याचे सांगत या निवडणुकीची सुरुवातही केली.
सध्या या बँकेवर राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित एसटी कामगार संघटनेची सत्ता आहे. याच संघटनेच्या विरोधात सदावर्ते यांनी रणशिंग फुंकले आहे. एसटी आंदोलनात सदावर्ते यांनी आधी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना लक्ष्य केले होते. आताही त्यांनी एसटी बँक निवडणुकीत राष्ट्रवादीलाच आव्हान देण्याचे ठरवले आहे.
पवारांशी आमची स्पर्धा नाही
राष्ट्रवादीचे वयोवृद्ध नेते शरद पवारांशी आमची स्पर्धा नाही, ते बँकेचे मालक आहेत का? ते सभासद आहेत का? त्यांनी सहकारमधून किती कष्टकर्यांची प्रगती झाली याची यादी जाहीर करावी.ज्यांना त्यांनी पुढे केले त्यांच्या मालमत्ता तपासा, असे आव्हानच अॅड. सदावर्ते
यांनी दिले.