Latest

छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी विशेष : नगरच्या किल्ल्यात कैद होत्या येसूबाई

मोनिका क्षीरसागर

नगर : संदीप रोडे
स्वराज्याच्या पहिल्या कुलमुखत्यार, मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांच्या धर्मपत्नी येसूबाई यांना शिवछत्रपतींचे स्वराज्य अबाधित राखताना अनेक संकटांचा सामना करावा लागला. सत्तापिपासू औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराज यांची हत्या केल्यानंतर महाराणी येसूबाई यांना बाळ शाहूराजे आणि मुलगी भवानीबाईसोबत अहमदनगरच्या भुईकोट किल्ल्यात कैदेत ठेवण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी, मातोश्री सकवारबाई याही त्यांच्यासोबत होत्या. नगरचे तुरुंग अधीक्षक शामकांत शेंडगे यांनी हा इतिहास शोधून काढला आहे.

आज (दि. 1 एप्रिल) धर्मवीर संभाजी महाराजांची पुण्यतिथी. कोकणातील दाभोळ येथील पिलाजीराव शिर्के यांच्या कन्या येसूबाई यांचा विवाह छत्रपती संभाजी महाराजांशी झाला. छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर रायगडावरून मोगलांशी 8 महिने लढा देणार्‍या येसूबाई याच ठिकाणी शेवटी मोगलांच्या तावडीत सापडल्या. 17 वर्षांनंतर बाळ शाहूराजे यांची औरंगजेबच्या मुलाने कैदेतून सुटका केली. मात्र, त्याचवेळी त्यांनी मोगलावर आक्रमण करू नये यासाठी येसूबाई यांची कैद 29 वर्षे कायम ठेवली होती. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर गादीवर बसण्यासाठी त्याच्या मुलांमध्ये वाद सुरू असताना पहिले पेशवे बाळाजी पेशवे यांनी येसूबाई यांची 4 जुलै 1719 ला सुखरूप सुटका केली होती. मोगलांच्या कैदेत असताना येसूबाई यांना नगरच्या भुईकोट किल्ल्यात ठेवण्यात आले होते. तशा नोंदी इतिहासाच्या पानांत शेंडगे यांना आढळून आल्या आहेत.

येसूबाईंच्या मृत्यूनंतर किल्ला मराठ्यांच्या ताब्यात!

नगरचा हा किल्ला भारतीय लष्कराच्या ताब्यात आहे. या किल्ल्याच्या संरक्षणासाठी किल्ल्याच्या सर्व बाजूंनी खोल खंदक खोदलेले आहेत. 1730 साली येसूबाई यांचा मृत्यू झाला, तर 1759 मध्ये मराठा व मोगलांच्यात झालेल्या युद्धात मोगलांचा पराभव करत मराठ्यांनी हा किल्ला ताब्यात घेतला होता.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT