Latest

असह्य वेदनांनी ती तडफडत होती! कोणीही मदतीसाठी पुढे आले नाही आणि…

दिनेश चोरगे

बंगळूर; वृत्तसंस्था :  'वाचवा… मला मदत करा…' अशा आर्त किंकाळ्या तिने फोडल्या. विजेचा धक्‍का बसल्यामुळे होणार्‍या वेदनांनी ती तडफडत होती; पण व्यर्थ! कोणीही तिच्या मदतीला धावले नाही. अखेर नको तेच घडले आणि त्या अभागी तरुणीने जगाचा निरोप घेतला. अखिला (वय 23) हे तिचे नाव.

सामाजिक बधिरतेचा धक्‍कादायक प्रकार बंगळूर शहरात घडला आहे. मुसळधार पावसामुळे तेथील रस्ते पाण्याखाली गेले आहेत. सोमवारी स्कुटीवरून नोकरीसाठी शाळेत निघालेल्या अखिला या तरुणीचा विजेचा धक्‍का लागून मृत्यू झाला. ती शाळेत नोकरी करायची. ती तडफडत होती, मदतीसाठी ओरडत होती. मात्र, काहीच उपयोग झाला नाही. विजेचा धक्‍का लागून तिचा मृत्यू झाला.

अखिला स्कुटीवरून जात असताना पाण्यात स्कुटी अडकली. यामुळे अखिला स्कुटीवरून उतरली आणि पायी चालायला लागली. अचानक खड्ड्यात पडल्याने ती घसरली. जवळच विजेचा खांब होता. अखिलाने आधारासाठी खांबाला पकडले आणि तिला विजेचा जबरदस्त धक्‍का बसला. ती मदतीसाठी आरडाओरडा करीत होती. मात्र, पाण्यात जाण्याची कोणाची हिंमत झाली नाही.
नागरिकांनी अखिलाला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी अर्ध्या तासापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले. या घटनेनंतर नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधातील रोष अधिकच वाढला आहे. अखिलाच्या कुटुंबीयांनी शहराच्या वीज व्यवस्थापन मंडळासह स्थानिक स्वराज्य संस्था प्रशासन आणि 'बीबीएमपी'वर ठपका ठेवला आहे.

विजेच्या धक्क्याने चौघांचा मृत्यू

गेल्या काही महिन्यांत बंगळूरमध्ये अशी चार प्रकरणे समोर आली आहेत. यापूर्वी 21 वर्षीय वसंतचा विजेचा धक्‍का लागून मृत्यू झाला होता. तो रस्त्यावर लोंबकळत असलेल्या वायरच्या कचाट्यात आला होता. त्याचवेळी 22 वर्षीय युवक फुटपाथवरून चालला असताना खांबाजवळील तारेच्या कचाट्यात येऊन विजेचा धक्‍का लागून मृत्यू झाला. त्याचप्रमाणे 30 वर्षीय व 40 वर्षीय पुरुषाचाही विजेचा धक्‍का लागून मृत्यू झाला होता.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT