Latest

अशांत पंजाबच्या मुळाशी…

अमृता चौगुले

परदेशी शक्तींच्या कटकारस्थानांशी संबंधित घटनांची संपूर्ण चौकशी होण्यापूर्वी त्यासंदर्भात कोणतीही वक्तव्ये न करणे टाळले पाहिजे. तपास यंत्रणांना कोणत्याही दबावाविना चौकशी करू दिली तरच खर्‍या दोषींपर्यंत पोहोचता येते. पंजाबमध्ये अशा विषयातही राजकीय लाभ घेण्याची शर्यत लागते. आपले निम्मे काम पंजाबमधील राजकीय पक्ष करतात, हे देशविरोधी शक्तींना चांगलेच ठाऊक आहे.

पंजाबचे तत्कालीन मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह जेव्हा जेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटत तेव्हा काँग्रेसमधील नेत्यांनी तो राजकीय मुद्दा केला. अमरिंदर प्रत्येक वेळी माध्यमांना सांगत की, पंजाब हे सीमावर्ती राज्य असून, सुरक्षिततेच्या दृष्टीने संवेदनशील आहे. राज्यात अशांतता निर्माण करण्यासाठी सीमेपलीकडून वेगवेगळी षड्यंत्रे रचली जातात. त्यामुळे गोपनीय माहितीची देवाणघेवाण आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनांवर चर्चा करणे अत्यावश्यक असते. तथापि, राजकीय शेरेबाजी करून या विचारविनिमयाचे गांभीर्य कमी करण्याचा प्रयत्न झाला. परंतु; गुरुवारी, 23 डिसेंबरला लुधियाना येथील न्यायालय परिसरात जो बॉम्बस्फोट झाला त्यातून स्पष्ट झाले की, सीमेपलीकडून केल्या जाणार्‍या कटकारस्थानांविषयी अमरिंदर सिंह जे बोलत होते, ते चुकीचे नव्हते. राज्यात लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत आणि अशा वेळीच हा बॉम्बस्फोट झाला. मागील निवडणुकी वेळीही अशा काही घटना घडल्या होत्या आणि आयएसआय तसेच परदेशात बसलेल्या अन्य शक्तींचा हात त्या घटनांमागे असल्याचे स्पष्ट झाले होते.

अनादराच्या नावाखाली केल्या जाणार्‍या निर्घृण हत्याही चिंताजनक आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाने घटनेचा अहवाल मागविला आहे. एनआयएकडे या प्रकरणाचा तपास सोपवला आहे. प्राथमिक तपासात असे पुढे आले की, मृत व्यक्तीच आरोपी असू शकते. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित चन्नी आणि गृहमंत्री सुखजिंदरसिंह रंधावा यांनी लुधियानाचा दौरा केला. अमली पदार्थांच्या तस्करांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा परिणाम म्हणून हा बॉम्बस्फोट झाला असावा, असे वक्तव्य त्यांनी केले आणि ते चूक आहे. बिक्रमसिंह मजीठियाच्या विरोधात नुकताच गुन्हा नोंदविला होता, हे या ठिकाणी उल्लेखनीय आहे. परदेशी शक्तींकडून केल्या जाणार्‍या कटकारस्थानांशी संबंधित घटनांची संपूर्ण चौकशी होण्यापूर्वी त्यासंदर्भात कोणतीही वक्तव्ये न करणे जबाबदार पदांवर बसलेल्या व्यक्तींकडून अपेक्षित असते. तपास यंत्रणांना कोणत्याही दबावाविना चौकशी करू दिली तर त्या खर्‍या दोषींपर्यंत पोहोचू शकतात. पंजाबमध्ये अशा विषयांतही राजकीय लाभ घेण्याची शर्यत लागते. आपले निम्मे काम पंजाबातील राजकीय पक्ष करता हे देशविरोधी शक्तींना चांगलेच ठाऊक आहे.
15 ऑगस्टनंतर 25 वेळा सीमेपलीकडून ड्रोनने भारतीय हद्दीत घुसखोरी झाली. ड्रोनच्या माध्यमातून शस्त्रास्त्रे, अमली पदार्थ आणि टिफीन बॉम्ब पाठविण्यात येत आहेत. अकरा टिफिन बॉम्ब जप्त केले गेले. आयबी आणि काऊंटर इंटेलिजन्सच्या सूत्रांचे म्हणणे असे आहे की, टिफीन बॉम्ब हा मोठा धोका आहे. कारण, असे बॉम्ब मोठ्या संख्येने पाठविले गेले असू शकतात. अजनाला येथील शर्मा फिलिंग स्टेशनवर झालेल्या स्फोटानंतर पोलिसांनी नजीकच्या गावातील चार युवकांना पकडले होते. हे चार युवक पाकिस्तानात वास्तव्यास असलेला इंटरनॅशनल सिख यूथ फेडरेशनचा प्रमुख लखबीरसिंह रोडेच्या संपर्कात होते. 15 सप्टेंबरला राजधानी दिल्लीत अटक केलेल्या जान मोहंमद, ओसामा, मूलचंद जीशान, मोहंमद अबू बकर आणि मोहंमद आमीर जावेद या सहा दहशतवाद्यांनी चौकशीदरम्यान मान्य केले होते की, त्यांना स्फोटके पंजाबमार्गे उपलब्ध करून दिली होती. दहशतवादी पंजाबात मोठा हल्ला करण्याच्या तयारीत आहेत, असे इशारे आयबीने अलीकडे सातत्याने दिले आहेत. पंजाबात जेव्हा जेव्हा टिफीन बॉम्ब आणि आरडीएक्स सापडले, तेव्हा तेव्हा त्याचा संबंध पाकिस्तानात वास्तव्यास असलेला इंटरनॅशनल सिख यूथ फेडरेशनचा प्रमुख लखबीरसिंह रोडेशी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पंजाबवर संकट कशा प्रकारे घोंगावत आहे, याचे संकेत ऑगस्ट 2021 पासून घडलेल्या घटनांमधून मिळतात. 8-9 ऑगस्ट रोजी फगवाडा, दलिके येथून टिफीन बॉम्ब, चिनी बनावटीचे हँड ग्रेनेड, आयडी बॉम्ब जप्त केले होते. अजनालामध्ये एका तेल टँकरखाली टिफीन बॉम्बचा स्फोट घडवून आणण्याचा प्रयत्न झाला. 15 सप्टेंबर रोजी दिल्लीत अटक केलेल्या दहशतवाद्यांना त्यांना स्फोटके आणि शस्त्रास्त्रे पंजाबमार्गेच पुरवली गेली होती. 23 सप्टेंबर रोजी भिखिविंड येथे टिफीन बॉम्ब आणि शस्त्रास्त्रे सापडली. 4 नोव्हेंबर रोजी रोजपूर पोलिसांनी झुगेवाला गावातून टिफीन बॉम्ब जप्त केला. 19 नोव्हेंबर रोजी फिरोजपूर पोलिसांनी शेखवा गावातील वन विभागाच्या हद्दीतून टिफीन हँड ग्रेनेड जप्त केला. 22 नोव्हेंबरला पठाणकोट लष्करी विभागात हँडग्रेनेडचा स्फोट झाला. 14 सप्टेंबर 2018 मध्ये जालंधरमध्ये मकसुदा पोलिस ठाण्यात झालेल्या स्फोटात पोलिस अधिकारी रमणदीपसिंह आणि कॉन्स्टेबल परमिंदरसिंह जखमी झाले होते.

पंजाबने पूर्वी किती धोकादायक कालावधीतून मार्गक्रमण केले आहे, हे विसरून चालणार नाही. राज्याबरोबरच देशानेही त्या काळात मोठी किंमत मोजली. त्या काळ्याकुट्ट दिवसांची पुनरावृत्ती भारताच्या एकता आणि अखंडतेसाठी आत्यंतिक धोकादायक ठरू शकते. अशा पार्श्वभूमीवर अनादरासारखे मुद्दे जाणूनबुजून मोठे करणे आणि लोकांच्या निर्घृण हत्या करणे अशा गोष्टींमुळे आपण धोक्याच्या दिशेने प्रवास सुरू करण्याची शक्यता आहे. शेतकरी आंदोलनाच्या अखेरच्या टप्प्यात कुंडली सीमेवर, नुकतेच सुवर्ण मंदिर परिसरात आणि कपूरथळा येथे जे घडले ते अमानवी आणि हृदय पिळवटून टाकणारे आहे. अशा घटनांंची अनुमती कोणत्याही धर्माने दिलेली नाही. म्हणूनच अशा घटना घडवून आणून जी मंडळी सामाजिक वैमनस्य वाढविण्याचा प्रयत्न करीत आहेत, अशा घटकांचा शोध घेणे आवश्यक आहे. अशा काळात तपास आणि गुप्तचर यंत्रणांनी अत्यंत संवेदनशीलपणे काम करायला हवे आणि दुसरीकडे राजकीय पक्षांनीही सावधगिरी आणि जबाबदारीचे दर्शन घडवायला हवे. आरोप-प्रत्यारोपांच्या राजकीय शर्यतीमुळे प्रचंड नुकसान होऊ शकते. सीमेपलीकडील देशांमध्ये बसून देशविरोधी कटकारस्थाने करणार्‍या शक्ती टपून बसलेल्या असताना त्यांचे मनसुबे उधळून लावणे हे सर्वांचे कर्तव्य आहे. परंतु; याउलट अशा शक्तींंच्या हाती कोलित दिले गेले तर पंजाब आणि देशाचेही हित धोक्यात येईल.

– व्ही. के. कौर

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT