Latest

अलास्कामध्ये कोसळले एलियन्सचे यान?

Arun Patil

वॉशिंग्टन : पृथ्वीशिवाय अन्य सृष्टी आहे की नाही हे अद्याप सिद्ध झालेले नाही. मात्र, अंतराळाच्या या अनंत पसार्‍यात केवळ पृथ्वी नामक ग्रहावरच जीवसृष्टी आहे असे मानणे हे विहिरीतील बेडकाच्या वृत्तीसारखेच होईल. अर्थात विज्ञानाने अद्याप मानवासारख्या प्रगत जीवांचे अन्य ग्रहांवरील अस्तित्व शोधलेले नाही. तरीही वेळोवेळी एलियन्सबाबतचे वेगवेगळे दावे जगभरातून केले जात असतात.

एलियन्सची अंतराळयाने, ज्यांना आपल्याकडे 'उडत्या तबकड्या' म्हटले जाते व इंग्रजीत 'अज्ञात उडत्या वस्तू' म्हणजेच 'अनआयडेंटिफाईड फ्लाईंग ऑब्जेक्टस्' (यूफो) म्हटले जाते, वेळोवेळी पृथ्वीवर येतात असे दावे केले जातात. आता असेच एक यान अलास्कामध्ये कोसळल्याचे म्हटले जात आहे. याबाबतचे कथित फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहेत.

अलास्काच्या आसमंतात नुकताच एक विचित्र ढग वाटावा असे द़ृश्य दिसून आले. काही लोकांचा दावा आहे की एलियन्सचे यान याठिकाणी क्रॅश झाले असून त्याच्या मागे राहिलेल्या धुराचा हा लोट आहे. लेजी माऊंटनच्या वर हा विचित्र ढग दिसून आला. काही लोकांनी त्याची छायाचित्रे टिपून ती सोशल मीडियात शेअर केली. ही छायाचित्रे सोशल मीडियात व्हायरलही झाली.

काही लोकांना वाटले की एखादे विमानच कॅ्रश झालेले असावे; पण त्याची खबर मीडियात आली नव्हती. त्यामुळे 'यूफो'च्या दाव्यांना बळ मिळाले. काहींचे म्हणणे आहे की हे एखादे गुप्त लष्करी शस्त्र असावे. त्याच्यामुळे हा विचित्र ढग तयार झाला. याबाबतच्या अफवांचे पेव फुटल्यावर अखेर अधिकार्‍यांनी त्याचा तपास सुरू केला. पर्वतावर तपासासाठी एक पथक पाठवण्यात आले.

हेलिकॉप्टरच्या सहाय्यानेही तपास करण्यात आला. मात्र, कोणतेही अवशेष किंवा संदिग्ध वस्तू दिसून आली नाही. ही घटना घडली त्यावेळी तेथून एक व्यावसायिक विमान उड्डाण करीत होते असे आढळले. मात्र, हे विमान गंतव्यस्थानी सुखरूप पोहोचल्याचेही तपासात आढळले. याच विमानावरून सूर्याची किरणे परावर्तित होऊन हे द़ृश्य निर्माण झाले असावे असे काहींना आता वाटत आहे. अर्थात त्याचीही पुष्टी झालेली नाही!

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT