Latest

अर्थज्ञान :  म्युच्युअल फंडची केवायसी करायचीय?

अमृता चौगुले

बँक तसेच अन्य आर्थिक संस्थांना 'नो युवर कस्टमर' म्हणजेच केवायसीची आवश्यकता असते. म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा असेल किंवा मुदतठेव करायची असेल किंवा बचत खाते सुरू करायचे झाल्यास, केवायसी बंधनकारक आहे. आरबीआयने 2002 मध्ये केवायसीची सुविधा बँका आणि आर्थिक संस्थांना सुरू केली. यामागचा उद्देश म्हणजे आर्थिक कंपन्यांना किंवा बँकांना ग्राहकाची माहिती वेळोवेळी मिळणे. ग्राहकांबाबत अपडेट राहिल्यास फसवणुकीला आळा बसू शकतो. म्युच्युअल फंडसाठीदेखील केवायसी आवश्यक आहे. ही केवायसी ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने करता येते. अनेकदा कामाच्या निमित्ताने आपला राहण्याचा पत्ता बदलतो. एका शहरातून दुसर्‍या शहरात जातो. मोबाईल नंबर बदलतो, परंतु बँकेकडे जुनाच नंबर असतो. त्यामुळे त्यास वेळोवेळी अपडेट करणे गरजेचे आहे.

ऑनलाईनवर अपडेट करा केवायसी

आपल्याला केवायसी अपडेट करायचे असेल, तर सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (सीडीएसएल)च्या संकेतस्थळावर जावे लागेल. तेथे केवायसी अप्लिकेशन फॉर्म डाऊनलोड करावा लागेल. अर्ज भरल्यानंतर आयडी, अ‍ॅड्रेस प्रुफ, पासपोर्ट आकाराचा फोटों द्यावा लागेल. आयडीसाठी पासपोर्ट, वाहन चालविण्याचा परवाना, मतदान ओळखपत्र, पॅन आणि आधार कार्डचा उपयोग करता येऊ शकतो.

हे अधिकृत

सेबी रजिस्टर्ड केवायसी नोंदणी संस्था हीच केवायसी सेवा देण्याबाबत अधिकृत आहे. त्यास केआरए असेदेखील म्हटले जाते. बीएसई टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड, कॅम्प्स इनवेस्टर सर्व्हिसेस, सीडीएसएल वेंचर्स लिमिटेड, एनएसडीएल डेटाबेस मॅनेजमेंट आणि डॉटेक्स इंटरनॅशनल सारख्या संस्थांचा समावेश आहे. या संस्थेच्या मदतीने केवायसीची प्रक्रिया पूर्ण करू शकतो.

ऑफलाईन केवायसी

म्युच्युअल फंडसाठी ऑफलाईन केवायसीदेखील करता येऊ शकते. कोणताही व्यक्‍ती एएमसी ऑफिस, केवायसी नोंदणी संस्था किंवा आर्थिक सल्लागाराच्या माध्यमातूनही केवायसी करू शकतोे. यासाठी एक पासपोर्ट आकाराचा फोटो, पॅन कार्ड, कोणतेही ओळखपत्र आणि रहिवासी पत्ता असणे गरजेचे आहे. संकेतस्थळावरून केवायसीचा अर्ज डाऊनलोड केल्यानंतर त्याला कागदपत्रे जोडावी लागतात. सर्व कागदपत्रे संबंधित ठिकाणी जमा केल्यानंतर केवायसीची प्रक्रिया पूर्ण होते.

फसवणूक टाळा

आजकाल हॅकर मंडळींद्वारे कोणत्या ना कोणत्या मार्गाने नागरिकांना फसव्या मेलच्या जाळ्यात अडकावायचे आणि खात्यातून पैसे काढून घ्यायचे, असे प्रकार सातत्याने उघडकीस येत आहे म्हणून बँका आणि आरबीआयकडून नागरिकांना सतत सजग केले जाते. हॅकर लोक फसवे मेसेज आणि मेल पाठवून ग्राहकांना केवायसी अर्धवट असल्याचे खोटे सांगतात. एक बनावट फॉर्म पाठवून तो भरण्यास सांगतात. एखादा ग्राहक त्यात सापडला, तर तो संपूर्णपणे विवरण भरतो आणि काही वेळातच त्याच्या खात्यातील पैसे गायब होतात. म्हणूनच ऑनलाईन केवायसी पूर्ण करून देणार्‍या फसव्या मेसेजपासून सावधगिरी बाळगावी.

म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी केवायसी असणे अनिवार्य आहे. केवायसीशिवाय कोणताही व्यक्‍ती म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करू शकणार नाही. केवायसी हे ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही मार्गाने अपडेट करता येऊ शकते.

– मेघना ठक्‍कर

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT