Latest

अमेरिकेतील ‘चायपानी’!

Arun Patil

वॉशिंग्टन : जगाच्या कानाकोपर्‍यात भारतीय खाद्यपदार्थांची चव पोहोचलेली आहे. विविध मसाल्यांनी खमंग बनलेले हे पदार्थ आता एरव्ही अळणी, बेचव पदार्थ खाणार्‍या पाश्चात्त्यांच्या जिभेला चटक लावत आहेत. अमेरिकेत तर भारतीय खाद्यपदार्थांचे अनेक रेस्टॉरंटस् आहेत जिथे बड्या सेलिब्रिटींपासून सर्वसामान्यांपर्यंत अनेकजण नियमित हजेरी लावतात. आता अशाच एका भारतीय रेस्टॉरंटला यंदाचा 'जेम्स बिअर्ड' हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळालेला आहे. या रेस्टॉरंटचे नाव आहे 'चायपानी'!

मेहेरवान इराणी यांच्या या 'चायपानी'ने पुरस्कार जिंकून लोकांचे लक्ष वेधून घेतले. मेहेरवान इराणी हे स्वतः एक उत्तम शेफ आहेत. अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिना भागात त्यांनी हे 'चायपानी' रेस्टॉरंट सुरू केले. अमेरिकेतील जेम्स बिअर्ड फाऊंडेशन ही संस्था पाककलेला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी जागतिक पुरस्कार प्रदान करते. या संस्थेकडून दिला जाणारा हा पुरस्कार पाककलेच्या क्षेत्रातील एक मानाचा, प्रतिष्ठेचा पुरस्कार मानला जातो.

या पुरस्कारामुळे एखादे रेस्टॉरंट दर्जेदार असल्याचे आपसुकच सिद्ध होत असते. यंदा हा मान 'चायपानी'ने पटकावला आहे. 2009 मध्ये अ‍ॅशव्हीले परिसरात सुरू झालेल्या या रेस्टॉरंटमध्ये भारताच्या कानाकोपर्‍यातील विविध पदार्थांची अस्सल चव चाखता येते व तीही कमी खर्चात! तिथे पाणीपुरीपासून इटली-रस्समपर्यंत सर्व काही मिळते. अगदी चहा-भजीचाही आनंद या रेस्टॉरंटमध्ये घेता येऊ शकतो.

SCROLL FOR NEXT