मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : कॉर्डेलिया क्रूझवरील ड्रग्ज पार्टीच्या प्रकरणात अटक करण्यात आलेला बॉलीवूडचा किंग खान शाहरुख याचा मुलगा आर्यन खानची पुराव्यांअभावी सुटका झाली. मात्र, अमेरिकेत शिकत असताना आपण गांजाचे सेवन करत असल्याचा एनसीबीला त्याने दिलेला जबाब समोर आला आहे. 'स्लीपिंग डिसऑर्डर' असल्यामुळे गांजाचे सेवन केल्याचे त्याने या जबाबात म्हटले आहे.
आर्यन खान याच्यासह अविन साहू, गोपाल आनंद, समीर सैघन, भास्कर अरोरा आणि मानव सिंघल अशा सहा जणांविरोधात सबळ पुराव्यांअभावी कोणतेही आरोप नसल्याचे नमूद करत केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाकडून (एनसीबी) क्लीन चिट दिली आहे. एनसीबीने विशेष न्यायालयात 14 आरोपींविरोधात 10 खंड असलेले 6 हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. त्यातून आता नवनवीन माहिती समोर येत आहे.
एनसीबीने आरोपपत्रात दिलेल्या माहितीनुसार, आर्यनने चौकशीदरम्यान कबूल केले होते की, 2018 मध्ये अमेरिकेत शिकत असताना तो गांजाचे सेवन करत होता. 'स्लीपिंग डिसऑर्डर' असल्यामुळे गांजाचे सेवन केल्याचे त्याने सांगितले होते. इंटरनेटवर सापडलेल्या काही लेखांमध्ये 'स्लीपिंग डिसऑर्डर'साठी गांजा उपयुक्त आहे, असे आपण वाचल्याचे त्याने एनसीबीला सांगितले होते. मोबाईल फोनमध्ये सापडलेले व्हॉट्सअॅप ड्रग चॅट आपणच केले होते, अशी कबुली त्याने दिल्याचीही माहिती मिळते.
आर्यन खान आणि अरबाज मर्चंट जवळचे मित्र आहेत. आर्यनने अरबाजला क्रूझ पार्टीदरम्यान गांजा न नेण्याचा सल्ला दिल्ला होता. अरबाज याने एनसीबीला दिलेल्या जबाबात याबाबत खुलासा केला आहे. एनसीबीने 14 जणांविरोधात दाखल केलेल्या आरोपपत्रात अरबाजला आरोपी ठरवण्यात आले आहे. छापेमारीनंतर त्याच्याकडून 6 ग्रॅम चरस जप्त करण्यात आले होते. जामीन मिळाल्यामुळे सध्या तो तुरुंगाबाहेर आहे.
एनसीबी सध्या खूप सक्रिय आहे. त्यामुळे ड्रग्ज विक्री करणार्यांनी क्रूझवर ड्रग्ज घेऊन न जाण्यास सांगितले होते. आर्यनला याबाबत माहीत होते. तसेच, आर्यनला त्याच्या आई-वडिलांनी कधी अशाप्रकारचे चुकीचे काम, विशेषत: ड्रग्जचे सेवन न करण्याचा सल्ला दिला आहे. आर्यनने याबाबत त्यांना सांगितले होते, असे अरबाज याने एनसीबीला दिलेल्या जबाबात म्हटले आहे.
अरबाज याने तो आणखी दोघांसह आर्यनच्या कारमधून क्रूझ टर्मिनलवर पोहोचला होता, असे कबूल केले. बॉलीवूड कलाकारांच्या मुलांसाठी पार्टीचे आयोजन करणार्या एका व्यक्तीचेही त्याने नाव घेतले आहे. या पार्टीत ड्रग्जचे सेवन होत असे, अशी माहिती सूत्रांकडून मिळते.