Latest

अमृता फडणवीस : मुंबईत खड्ड्यांमुळे होतात 3% घटस्फोट

Arun Patil

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे आणि वाहतूक कोंडीमुळे एकूण घटस्फोटांपैकी तीन टक्के घटस्फोट होत असल्याचे खळबळजनक वक्तव्य अमृता फडणवीस यांनी करीत शिवसेनेवर निशाणा साधला आहे. त्यावर महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रत्युत्तर देत फडणवीस यांचे वक्तव्य हे हास्यास्पद असल्याचे सांगत, त्यावर हसावं की रडावं ते कळत नाही, असा टोला लगावला आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या आपली वक्तव्ये, ट्वीट आणि महाविकास आघाडीतील नेत्यांवरील टीकेमुळे नेहमी चर्चेत असतात. त्यांनी शुक्रवारी केलेल्या वक्तव्यवरून नवीन चर्चेला तोंड फुटले.

मी फडणवीसांची बायको आहे हे तुम्ही विसरून जा. मी सामान्य नागरिक म्हणून बोलते. मी रोज सामान्य स्त्री म्हणून घराबाहेर पडते. त्यावेळी मलाही वाहतूक कोंडी आणि रस्त्यांवरील खड्ड्यांचा त्रास होतो. रस्त्यावर कायम वाहतूक कोंडी असते, त्यात खड्डे आहेतच. या वाहतूक कोंडीमुळे मुंबईत तीन टक्के घटस्फोट होतात. परिणामी मुंबईकर कुटुंबाला वेळ देऊ शकत नाहीत, असे त्या म्हणाल्या.

त्यांच्या या वक्तव्याचा महापौर किशोरी पेडणेकर यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. फडणवीस यांच्यावर टिका करताना त्या म्हणाल्या, अमृता फडणवीस यांचा तर्क हास्यास्पद आहे. त्या दरवेळी ऐकावं ते नवलंच अशाप्रकारचे बोलत असतात. आता तर त्यांनी जावईशोध लावला आहे. त्यांच्या या वक्तव्यावर हसावं की रडावं असा प्रश्न मुंबईकरांना पडला आहे.

सरकार केवळ खिसे भरू लागले

मुंबईत अनेक प्रश्न आहेत. मेट्रो, रस्ते, एसटी कर्मचार्‍यांचे प्रश्न आहेत. त्याकडे लक्ष न देता सरकार केवळ खिसे भरू लागले तर त्यावर टीका होणारच. तुम्ही या मुद्द्यांवर लक्ष दिले पाहिजे. ती मुंबईची गरज आहे, असेही अमृता फडणवीस यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT