Latest

अमर, अमृत स्वर !

अमृता चौगुले

स्वर्ग आणि स्वर्गीय आविष्कार ही संकल्पना वेद आणि पुराणातील. किंबहुना सर्वच धर्मीयांच्या धर्मग्रंथात ही संकल्पना या ना त्या स्वरूपात आलेलीच आहे. मानवी अनुभवांच्या मर्यादेत कधी ही संकल्पना वास्तवात आल्याचे उदाहरण नाही. तथापि, लता मंगेशकर नावाच्या एका अद्भुत आणि अलौकिक स्वरब्रह्माने पृथ्वीतलावर जन्म घेतला आणि स्वर्गीय आविष्कार या विशेषणाला वास्तवाचे रूप आले. लतादीदींच्या स्वर्गीय सुरांनी भारतातच नव्हे, तर सातसागरांपलीकडेही गारुड केले आणि तब्बल चार पिढ्यांवर अधिराज्य गाजवले. येणार्‍या भावी पिढ्यांवरही लता मंगेशकर या नावाची जादू अखंड आणि अमिट अशीच राहणार आहे. खर्‍या अर्थाने दीदींच्या कंठातून उमटलेले सप्तसूर हे कल्पांतापर्यंत या विश्वाच्या अवकाशात प्रतिध्वनीत होत राहतील आणि तीच त्यांची ओळख कायमस्वरूपी राहणार आहे. संगीताच्या इतिहासात अलौकिक अमर, अमृत सूर अशीच या स्वरब्रह्माची नोंद राहणार आहे.

1942 मध्ये 'किती हसाल' या मराठी चित्रपटासाठी त्यांनी सर्वप्रथम पार्श्वगायन केले होते. त्याच साली 'पहिली मंगळागौर' या चित्रपटातून लतादीदींनी चित्रपटसृष्टीच्या रूपेरी दुनियेत आपले सोनपाऊल उमटवले. तेव्हा सारे राजयोग, सारे अमृतयोग आणि सारे शुभयोग भारतीय चित्रसृष्टीच्या कुंडलीत एकत्र आले असणार, यात शंकाच नाही. उस्ताद गुलाम हैदर यांच्या पारखी नजरेने लतादीदींच्या कंठातील कोहिनूर स्वर हेरला होता. ते होते 1945 साल. 1947 मध्ये वसंतराव जोगळेकर यांच्या 'आप की सेवा में' या चित्रपटात त्यांना हिंदीमध्ये पार्श्वगायनाची प्रथम संधी मिळाली. 'अंग्रेजी छोरा चला गया', 'दिल मेरा तोडा' या गाण्यांनी या देवोदुर्लभ कंठाचा बोलबाला झाला. नूरजहाँ, अमीरबाई कर्नाटकी, शमशाद बेगम यांच्या तुलनेत त्यांचा आवाज कोमल; पण त्यात एक विलक्षण अपूर्वाई होती आणि या अपूर्वाईनेच पाहता पाहता सारे विश्व व्यापून टाकले.

1949 साली 'महल' आला आणि चित्रपटसृष्टीतील पार्श्वगायन क्षेत्रात सत्तांतरच झाले. लतादीदींच्या 'आयेगा, आयेगा, आयेगा आनेवाला' या अविस्मरणीय स्वरांनी विनटलेल्या गाण्याने इतिहास घडवला. महालपासून झोपडीपर्यंत हा अवीट सूर जाऊन पोहोचला आणि तेव्हापासून सुमारे आठ दशके या सुराने रसिकांच्या हृदयसिंहासनावर सलग अधिराज्य गाजवले. सूर्योदयाबरोबरच तारे, तारकांचा अस्त होतो. तद्वतच लता नावाचा स्वरसूर्य उदयाला आला आणि तत्कालीन गायिका आपोआपच मागे पडल्या. पुढेही प्रदीर्घकाळ त्यांच्या कोणी जवळपास येऊ शकले नाही. लतादीदी आणि चित्रपटगाणे हे जणू समीकरणच बनले. चित्रपटसृष्टीत अनेक समीकरणे जुळली, बिघडली आणि मोडली; पण या समीकरणाला कधीच बाधा आली नाही. त्यांचे स्थान चित्रपटसृष्टीत अढळ धु्रवासारखे राहिले आणि तेवढ्या उंचीवर पोहोचणे सोडाच; पण तिथवर नजर टाकणेही कोणाला शक्य झाले नाही. 'टाइम'ने त्यांना 'भारतीय पार्श्वगायनातील एकछत्री सम्राज्ञी' म्हणून संबोधले आहे. ते वास्तव आणि यथार्थच आहे.

लतादीदींच्या असामान्य आणि अभूतपूर्व अशा महान कारकीर्दीचा साधा आढावाही एका स्वतंत्र ग्रंथाचा विषय होऊ शकतो. एक दृष्टिक्षेपही जरी टाकला, तरी त्यांच्या आभाळाएवढ्या कर्तृत्वाने भारावून जायला होते. तीसपेक्षा अधिक भाषांतून लतादीदींनी गाणी गायली आहेत आणि त्यांच्या गाण्यांची संख्या तीस हजारांच्या पुढे आहे. चार तपांपूर्वीच म्हणजे 1974 साली सर्वाधिक गाणी गायल्याबद्दल 'गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्'मध्ये त्यांच्या या विक्रमाची नोंद करण्यात आली होती.

दादासाहेब फाळके पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला आणि 'फिल्मफेअर'च्या जीवन गौरव पुरस्कारासह त्यांना सातवेळा फिल्मफेअर पुरस्काराने गौरव करण्यात आला. तसेच तीनदा राष्ट्रीय पुरस्कार अशा सन्मानासह 2001 मध्ये 'भारतरत्न' या सर्वोच्च नागरी पुरस्काराने त्यांच्या अजोड कारकीर्दीचा गौरव करण्यात आला. दीदींना असे अनेक पुरस्कार प्राप्त झलो. मात्र, संसार सागरातील वादळात जीवननौका हाकणार्‍या सर्वसामान्य कष्टकरी, कामकरी, श्रमजीवी वर्गापासून ते उच्चभ्रूपर्यंत सर्वांच्या संकटकाळात आणि असंख्य अडचणींच्या काळात दीदींच्या अमृतस्वरांनी त्यांना जो सुखद दिलासा दिलेला आहे, त्याला तोड नाही. म्हणून रसिकांचे प्रेम हेच त्यांना मिळालेले सर्वोच्च पारितोषिक म्हटले पाहिजे. त्यांच्या स्वरांनी अनेकांच्या दुःखावर फुंकर घातली. जगण्याची नवी उमेद दिली. एका संगीतयात्रीला यापेक्षा अधिक समाधान काय असणार?

लतादीदी आणि दै. 'पुढारी' यांचा जिव्हाळ्याचा संबंध. सन 1999 हे 'पुढारी'चे हीरक महोत्सवी वर्ष. विविध उपक्रमांनी हे वर्ष मोठ्या हर्षोल्हासाने साजरे झाले. एक जानेवारी या दिवशी हीरक महोत्सवाच्या शुभारंभाला लतादीदी प्रमुख पाहुण्या म्हणून मोठ्या आनंदाने आवर्जून उपस्थित राहिल्या. त्यांच्या हस्ते समारंभाचे दीपप्रज्वलन झाले. आपल्या स्वर्गीय स्वरात त्यांनी 'पुढारी'ला शुभेच्छा दिल्या आणि 'पुढारी'चा उत्तरोत्तर सर्वांगीण विकास होवो, अशा भावना व्यक्त केल्या. 'पुढारी'विषयीची आपल्या मनातील अकृत्रिम आत्मीयता त्यांनी मोठ्या ऋजु स्वरात प्रकट केली.

माध्यमाच्या विविध क्षेत्रांत पदार्पण करावे, ही 'पुढारी'च्या नव्या पिढीची महत्त्वाकांक्षा! 'टोमॅटो एफ.एम. 94.3' हे दै. 'पुढारी'चे भावंड. 'पुढारी'चे समूह संपादक डॉ. योगेश जाधव यांनी हे एफ.एम. रेडिओ केंद्र सुरू केले. एका नव्या दालनात प्रवेश झाला. त्याचा शुभारंभ 21 सप्टेंबर 2007 रोजी झाला आणि तोही लतादीदींच्या शुभ हस्ते! लतादीदींच्या सुरेल कंठातून उमटलेल्या शब्दांनी 'टोमॅटो एफ.एम.'चा आरंभ झाला. त्यांनी दिलेल्या शुभेच्छांमुळेच 'टोमॅटो' विविध उपक्रम राबवीत समाजात लोकप्रिय ठरलेला आहे.

1950 नंतर लतादीदींचा उत्कर्षाचा जो काळ सुरू झाला, तो कधीच थांबला नाही. त्या काळातील अनिल विश्वास, नौशाद, सज्जाद हुसेन, वसंत देसाई, हंसराज बहल यांच्यासारखे जुने-जाणते संगीतकार आणि नंतरच्या काळात उदयाला आलेले एस. डी. बर्मन, सलील चौधरी, सी. रामचंद्र, शंकर-जयकिशन, मदन मोहन, उषा खन्ना, रवी, कल्याणजी-आनंदजी, लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि आर. डी. बर्मन यासारख्या आणि त्यानंतरही आलेल्या संगीतकारांना लतादीदींशिवाय पर्याय नव्हता. अनेक संगीतकारांची कारकीर्द केवळ लतादीदींच्या गाण्यांमुळे आकाराला आली आणि बहरली.

लक्ष्मीकांत-प्यारेलाल या जोडीला तर त्यांनीच संगीतकार बनवलं. त्यांच्यातील गुण हेरून त्यांनीच त्यांना संधी मिळवून दिली आणि पुढे लक्ष्मी-प्यारेंनी इतिहास घडवला. माणसं पारखण्याची, जोखण्याची आणि त्यांना प्रोत्साहित करण्याची किमया लतादीदींकडे जात्याच होती. लतादीदींनी गायिलेल्या प्रसिद्ध गाण्यांची यादी करायचे म्हटले, तर अवघड आहे. प्रत्येक गाणेच दर्जेदार आणि वेगळी उंची गाठणारे! दुसर्‍या गुणी गायिकांना संधी मिळावी म्हणून त्यांनी स्वतःहून फिल्मफेअर पारितोषिक घेण्याचे थांबविले. यातून त्यांच्या मनाचा मोठेपणा दिसून येतो.

1962 च्या चिनी आक्रमणातील शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी लतादीदींनी गायिलेले 'ऐ मेरे वतन के लोगो' हे गीत आजही देशभक्तीपर गाण्यांमध्ये अग्रक्रमावर आहे. हे गाणे ऐकून तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना आपले अश्रू आवरता आले नाहीत. हिंदी चित्रपटात कारकीर्द घडत असताना लतादीदी मायमराठीला विसरल्या नाहीत. 'आनंदघन' या नावाने दिलेले संगीत असो किंवा त्यांनी म्हटलेली मराठी भावगीते, चित्रपट गीते असोत. लतादीदींनी नेहमीच गुणवत्तेची पाठराखण केली. लतादीदींनी इतर छंदही जाणीवपूर्वक जोपासले. दीदींना छायाचित्रे काढायला खूप आवडत. क्रिकेटची मॅच बघणे हा त्यांचा आवडता छंद होता. या वयातही त्या सोशल मीडियावर सक्रिय होत्या. भारताने एखादी क्रिकेट मॅच जिंकली की, अभिनंदनाचा पहिला ट्विट लतादीदींचा असायचा!

एक गायिका म्हणून लतादीदी जेवढ्या श्रेष्ठ होत्या, तेवढ्याच त्या एक माणूस म्हणूनही थोर होत्या. मराठी चित्रपटांचे बजेट तोकडे असते. त्यांची बाजारपेठही मर्यादित असते; हे ठाऊक असल्यामुळे लतादीदींनी मराठी चित्रपटांच्या पार्श्वगायनाचे मानधन कधीच घेतले नाही. टेक ओके झाला की, त्या सरळ निघून जायच्या. एकदा तर एका जुन्या-जाणत्या मराठी दिग्दर्शकाला एका आर्थिक व्यवहारामध्ये पोलिसांनी अटक केली. ते लतादीदींना समजताच स्वतः रात्री बारा वाजता पोलिस ठाण्यात जाऊन त्यांनी एक लाख रुपयांच्या जामीनपत्रावर सही केली होती. दीदींनी केवळ आपल्या गळ्यातील गंधारच जपला नाही, तर माणुसकीचे ऋणानुबंधही जपले, हेच यावरून सिद्ध होते.

दीदी पार्थिव देहाने पंचत्वात विलीन झाल्या असल्या, तरी त्यांचे शाश्वत सूर रसिकांसाठी मर्मबंधातील ठेव आहेत. 'आयेगा, आयेगा, आयेगा आनेवाला' या गूढ गीताची मोहिनी पाऊण शतकानंतरही कायम आहे. 'लटपट लटपट तुझं चालणं'मधला नखरा रसिक मनात रुंजी घालतो आहे. 'धीरे से आजा रे' या लोरीतील शांत स्वर सुख-दुःखापलीकडे नेणारा आहे. 'गंगा, यमुना डोळ्यात उभ्या का' हे सत्तर वर्षांपूर्वीचे गीत अद्यापही विवाह समारंभात वाजविले जाते. लतादीदींच्या कंठातील अशी अनेक असंख्य गीते अजरामर आहेत, याच्या किती साक्षी नोंदवाव्यात? 'रसिक बलमा', 'चाँद फिर निकला' अशा विरह गीतातील आर्तता अंतःकरणात आजही भिडणारी आहे. 'ऐ मेरे वतन के लोगो'मधील देशभक्तीची भावना मन उचंबळवणारी आहे. 'ये जिंदगी उसी की है', 'मोहे भूल गये सावरिया' यातील स्वरांनी कोणाचेही दिल व्याकूळ झाल्याशिवाय राहत नाही. 'प्यार किया तो डरना क्या'मधील प्रीतीचा आविष्कार आणि आव्हान आजही ताजेतवाने आहे. ख्यातनाम निर्माते-दिग्दर्शक मेहबूब लंडनमध्ये मृत्युशय्येवर होते, तेव्हा त्यांनी दीदींना 'रसिक बलमा' गाण्याची फर्माईश केली. दीदींनी ती फोनवरून पूर्ण केली. त्या थोर निर्मात्याने आपल्या इच्छेतून दीदींच्या स्वरमाधुरीला जणू मानाचा मुजराच केला.

सज्जाद हुसेन हे अभिजात संगीतकार. तेवढेच तोंडाने फटकळ. एकदा एका मुलाखतीत लतादीदींविषयी बोलताना ते म्हणाले, 'एक लता ही तो गाती है। बाकी सब रोती है।' सुप्रसिद्ध सनईवादक बिस्मिल्ला खाँ हे दीदींच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त म्हणाले होते, 'सारी जिंदगी हमने इसी बातका इंतजार किया की, लता कभी ना कभी बेसुरी हो जाए। लेकिन ये होती ही नहीं' अशा या स्वरसम्राज्ञीला आपण भारतीय 'गानकोकिळा' म्हणून तिचा गौरव जसा करतो, अगदी तसेच सारे जग 'नाईंटिंगेल ऑफ इंडिया' म्हणून तिचे कौतुक करतात, हे यथार्थच आहे. लतादीदींच्या स्वरविलासाची महती किती गावी? किती सांगावी?

हमारे बाद अब महफिल में, अफसाने बयाँ होंगे-
बहारे हम को ढूँढेगी, न जाने हम कहाँ होंगे-

दीदींच्या या गीताचेच वास्तव सामोरे आले आहे. या अमर आणि अमृत स्वरांना आमची विनम्र आदरांजली!

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT