Latest

अभियांत्रिकीची पुस्तकेही मायबोलीतून! पॉलिटेक्निक ११, अभियांत्रिकीची ९ अशी पहिल्या टप्प्यात २० पुस्तके मिळणार

मोहन कारंडे

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : अभियांत्रिकी शिक्षण गेल्यावर्षीपासून मायबोलीतून देण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता मराठीतून शिकत असलेल्या अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांना मराठी पाठ्यपुस्तकांचा पहिला संच मिळणार आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, तंत्रशिक्षण संचालनालयाच्या वतीने मुंबई विद्यापीठात सोमवारी पहिल्या वर्षांसाठी २० मराठी पाठ्यपुस्तकांचे प्रकाशन करणार आहेत.

विद्यार्थ्यांना इंग्रजीव्यतिरिक्त प्रादेशिक भाषेमध्येही अभियांत्रिकीचे शिक्षण घेता यावे यासाठी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने गेल्या वर्षीपासून प्रादेशिक भाषेत अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी एआयसीटीईने मान्यतेची प्रक्रिया पूर्ण केली. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने राज्य सरकारने पावले उचलली आहेत. बहुभाषिकता आणि मातृभाषेची ताकद नवीन शिक्षण धोरणामध्ये नमूद करण्यात आली आहे. त्यानुसार आता विद्यार्थ्यांना मातृभाषेत शिकताना पूरक ज्ञान मिळावे यासाठी पुस्तकांचीही निर्मिती केली आहे. मातृभाषेतून शिक्षण घेण्यासाठी राज्यातील विद्यार्थ्यांनी गेल्या वर्षी आणि यंदाही मोठा प्रतिसाद दिला आहे.

या विद्यार्थ्यांना आता मायबोलीतून असलेल्या पुस्तकांचा मोठा फायदा होणार आहे. मूळ अभियांत्रिकी पाठ्यपुस्तके, भारतीय तंत्रज्ञान संस्था आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधील प्राध्यापकांनी इंग्रजीत लिहिलेली आहेत, एआयसीटीई ने अनुवादित आणि प्रकाशित केली आहेत. महाराष्ट्रातील अनेक महाविद्यालयांना या पुस्तकांचा एक संच मिळणार आहे. पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी ११ पाठ्यपुस्तके, पदवीधरांसाठी नऊ अशी २० पुस्तके अनुवादित केली आहेत. ही सर्व पुस्तके ऑनलाइन सेवेद्वारे तसेच बाजारातून विद्यार्थ्यांना खरेदी करणे शक्य होणार आहे.

अभियांत्रिकी शिक्षण राबवित असलेल्या संस्थांच्या प्राचार्यांना व विद्यार्थ्यांना मराठी भाषेतील पुस्तकांच्या संचाचे प्रकाशन सोहळा व वितरण होणार आहे. तंत्रशिक्षण संचालनालयाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमास पदवी व पदविका अभ्यासक्रमांच्या संस्थांचे ३०० प्राचार्य प्रत्यक्ष उपस्थित राहतील.

कलिना संकुलातील ग्रीन टेक्न- ओलॉजी हॉलमध्ये स. १०.३० वाजता होणाऱ्या कार्यक्रमास केंद्रीय शिक्षण राज्य मंत्री डॉ. सुभाष सरकार, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, एआयसीटीई आणि विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष प्रा. जगदेश कुमार आदी उपस्थित राहणार आहेत.

पाठ्यपुस्तक वितरणाच्या कार्यक्रमानंतर दुपारच्या सत्रामध्ये तंत्र शिक्षणाच्या गुणवत्ता वाढीच्या अनुषंगाने संचालनालयाद्वारे तज्ञांची व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत. हज्ञा कार्यक्रम ऑनलाइनही पाहता येणार आहे, अशी माहिती तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. अभय वाघ यांनी केले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT