Latest

अपघातात दोन पाय, एक हात गमावलेल्या सूरजने केले ‘यूपीएससी’चे शिखर सर

Arun Patil

लखनौ, वृत्तसंस्था : रेल्वे अपघातात दोन पाय, उजवा हात आणि डाव्या हाताची दोन बोटे गमावलेल्या उत्तर प्रदेशच्या सूरज तिवारीने यूपीएससी परीक्षेचे अवघड शिखर पादाक्रांत केले आहे. त्याने 917 वे रँकिंग मिळवत यशाचे दार उघडले.

यंदाच्या यूपीएससी परीक्षेत यशस्वी झालेल्या उमेदवारांच्या अनेक प्रेरक कथा समोर येत आहेत. अशीच एक कथा उत्तर प्रदेशच्या मैनपुरी या छोट्या शहरातील सूरज तिवारी याची आहे. दोन पाय आणि एक हात नसलेल्या सूरजने यूपीएससीच्या परीक्षेत 917 वे रँकिंग मिळवत सर्वांच्या कौतुकाचे केंद्रस्थान बनला आहे. 2017 मध्ये गाझियाबादच्या दादरी येथे एका रेल्वे अपघातात सूरजने दोन्ही पाय आणि उजवा हात गमावला. तसेच डाव्या हाताची दोन बोटेही या अपघातात छाटली गेली.

इतकी सारी प्रतिकूल स्थिती असतानाही सूरजने यूपीएससीचा अभ्यास सुरू केला. अवघ्या तीन बोटांच्या मदतीने तो नोटस् काढत असे. रात्र रात्र जागून अभ्यास करत असे. तीन बोटांच्या मदतीने पेपर सोडवण्यासाठी हवा असलेला वेग मिळवण्यासाठी त्याला खूप मेहनत घ्यावी लागली. त्याने यूपीएससीचे अवघड शिखर सर करीत सार्‍या अडचणींवर मात केली. त्याचे वडील रमेश तिवारी आणि आई आशा देवी तिवारी यांनी मुलाचा आपल्याला अभिमान आहे असे सांगताना, अवघी तीन बोटेही यश मिळवून देऊ शकतात हे त्याच्याकडे पाहून पटते, असे म्हटले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT