Latest

अनोखा दत्तकविधान सोहळा : मुलाच्या बदल्यात मुलगी, मुलीच्या बदल्यात मुलगा!

Arun Patil

जत, विजय रुपनूर : मोठ्या भावाला दोन मुले. पण, त्याला हवी होती किमान एक मुलगी; तर त्याच्या धाकट्या भावाला दोन मुली. पण, त्याला लागली होती मुलाची आस… दोघांनी आणखी एकेक अपत्य जन्माला घालण्याऐवजी स्वीकारला अनोखा मार्ग. धाकट्याची मुलगी मोठ्याने दत्तक घेतली तर मोठ्याचा मुलगा धाकट्याने दत्तक घेतला. हा अनोखा दत्तकविधान सोहळा मंगळवारी जत तालुक्यातील शेगाव येथे उत्साहात पार पडला.

शेगाव येथील बिरुदेव सुखदेव माने आणि त्यांचा लहान भाऊ आप्पासाहेब माने हे एकत्र कुटुंबातच राहतात. थोरला भाऊ बिरुदेव याला मुलगी व्हावी, असे वाटत होते. मात्र, त्याला दोन मुलेच झाली. दुसरीकडे लहान भाऊ आप्पासाहेब यालाही दोन मुलीच आहेत. थोरल्या भावाला मुलीची तर धाकट्या भावाला मुलाची आस होती. यावर उपाय म्हणून माने बंधूंनी कुटुंबाशी चर्चा करून आपापल्या प्रत्येकी एक मुलगा-मुलीची दत्तक विधानाने अदलाबदल करायचा निर्णय घेतला.

सरकारी सेवेत असलेले बिरुदेव माने अनेक वर्षे पुरोगामी चळवळीत काम करतात. त्यांना शिवम आणि आरुष ही दोन मुले आहेत. तर त्यांचा धाकटा भाऊ आप्पासाहेब यांना संस्कृती आणि अन्विता या दोन मुली आहेत. दोघा भावांनी एकत्र विचार करून आरुषला आप्पासाहेबकडे दत्तक देऊन त्यांची मुलगी अन्विता हिला बिरुदेवकडे दत्तक घेण्याचा निर्णय घेतला.

मंगळवारी अन्विता हिचे बारसे होते. त्यासाठी सर्व पै-पाहुण्यांना निमंत्रित करण्यात आले. दुसर्‍या बाजूला दत्तकविधानाची कायदेशीर प्रक्रियाही पार पाडण्यात आली. सर्व उपस्थितांच्या साक्षीने मुलीचे बारसे घालून तिचे नाव अन्विता असे ठेवले आणि पाठोपाठ दत्तकविधान सोहळाही पार पडला. दत्तकपुत्र, दत्तकपुत्री आपापल्या नव्या आई-वडिलांच्या म्हणजेच काका आणि काकूंच्या कुशीत गेली. त्यावेळी सर्वांचा ऊर अभिमानाने भरून आला. हा अनोखा सोहळा पाहताना अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.

आगळा-वेगळा आदर्श

मुलाच्या हव्यासापोटी होणारी कुटुंबाची परवड अनेक ठिकाणी दिसते. त्यातही त्या महिलेला अनेक गोष्टी सहन कराव्या लागतात. मुलगी नकोच असा अट्टहास करणारेही अनेक आहेत. अशा सगळ्या परिस्थितीत आपल्या मुलांची घरातच अदलाबदल करून दोन्ही कुटुंबांना मुलगा आणि मुलीचे पालक होण्याचा आनंद मिळवून देणारा हा प्रसंग आगळा-वेगळा आदर्शच म्हणावा लागेल.

SCROLL FOR NEXT