मुंबई;पुढारी वृत्तसेवा : राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्याविरोधात सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने शंभर कोटी रुपयांच्या खंडणी घोटाळ्यात लुकआऊट नोटीस बजावल्याचे कळते. मात्र, मुंबईतील ईडीच्या अधिकार्यांनी या नोटिसीला दुजोरा दिलेला नाही.
अनिल देशमुख यांनी गृहमंत्री असताना शंभर कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला होता. त्यानंतर ईडीने या गैरव्यवहाराचा तपास सुरू केला.
आतापर्यंत ईडीने देशमुख यांना 5 वेळा समन्स बजावून चौकशीसाठी पाचारण केले आहे. मात्र, या चौकशीला उपस्थित राहणे त्यांनी टाळले आहे. या विरोधात त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. मात्र तेेथेही त्यांना दिलासा मिळू शकला नाही.
त्यानंतर ईडीने देशमुख यांना सहावे समन्स बजावण्याची तयारी सुरू केली आहे. त्यातच ईडीने देशमुख यांच्याविरोधात लुकआऊट नोटीस बजावल्याचे समजते. जर ही नोटीस बजावली गेली असेल तर देशमुख यांना देश सोडून जाता येणार नाही.
या प्रकरणात ईडीने 12 ते 14 ठिकाणी छापेमारी केली असून, ईडीची तीन पथके कार्यरत आहेत. देशमुख यांच्या शैक्षणिक संस्थांसाठी सुमारे साडेचार कोटींची खंडणी बनावट कंपन्यांमार्फत मिळवण्यात आल्याचे ईडीच्या तपासात पुढे आले आहे. याच प्रकरणात देशमुख यांच्या स्वीय सचिव आणि स्वीय सहायकांना अटकदेखील करण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणाचा तपास सीबीआयकडूनही सुरू आहे. दोनच दिवसांपूर्वी सीबीआयकडून अनिल देशमुख यांचे वकील अॅड. आनंद डागा यांना तपास भरकटवण्याच्या प्रयत्नाखाली अटक झाली आहे.