अनलॉक अंतर्गत राज्यातील सर्व दुकाने, शॉपिंग मॉल्स, हॉटेल्स, रेस्टॉरंटस् रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी राज्य सरकारने बुधवारी दिली. मंगल कार्यालये, इनडोअर खेळांनाही परवानगी दिली आहे. तथापि, मंदिरे, प्रार्थनास्थळे, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, मल्टिप्लेक्स आदी तूर्त बंदच राहणार आहेत.
येत्या 15 ऑगस्टपासून अनलॉक अंतर्गत लागू नियमांची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याने राज्यातील जनतेला कोरोना निर्बंधांतून जणू स्वातंत्र्य मिळाले आहे. राज्यातील जनतेला दिलासा देणारी ही माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी दिली. कोरोना
अनलॉक प्रक्रियेसंदर्भात निर्बंधांतून शिथिलता देण्याचा निर्णय घेतल्याने दुकानदार, शॉपिंग मॉल्स आणि हॉटेल्स, रेस्टॉरंटस् व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
राज्य मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहावर बुधवारी सायंकाळी पार पडली. यात राज्यात लागू असलेल्या कोरोना निर्बंधांत आणखी शिथिलता देत अनलॉक करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
हॉटेलचालक आनंदले !
अनलॉक बाबत निर्णय घेत राज्य शासनाने राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये रात्री 10 वाजेपर्यंत रेस्टॉरंट खुली करण्यास परवानगी दिल्याने नक्कीच या क्षेत्रातील उलाढाल 50 टक्क्यांनी वाढेल, अशी प्रतिक्रिया आहार या रेस्टॉरंट चालकांच्या शिखर संघटनेचे अध्यक्ष शिवानंद शेट्टी यांनी व्यक्त केली आहे. सर्व रेस्टॉरंट व्यवसायिकांनी कोरोना नियमावलीचे कठोर पालन करावे, असे आवाहनही संघटनेने केले आहे.
मध्यरात्री दीड वाजेपर्यंत परवानगी द्या
हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडियाचे अध्यक्ष शेरी भाटिया म्हणाले की, अनलॉक बाबत निर्णय घेत रात्री 10 वाजेपर्यंत परवानगी देणार्या शासनाने लवकरच मध्यरात्री दीड वाजेपर्यंत असलेली परवानगी पूर्ववत करण्याची गरज आहे. याआधी डायनिंगसाठी फक्त सायंकाळी 4 वाजेपर्यंत असलेल्या परवानगीमुळे म्हणावा तितका व्यवसाय होत नव्हता.
निर्णय स्वागतार्ह
गेले दीड वर्ष निर्बंधांमुळे राज्यातील व्यापार उद्योग क्षेत्र प्रचंड अडचणीत आले आहे. काही जिल्ह्यात महापुरानेही व्यापार्याला मोठा तडाखा दिला आहे. अशा पार्श्वभूमीवर राज्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळ्या वेळांचे निर्बंध किंवा सवलती मिळाल्याने सर्वच व्यापारी वर्गात मोठी नाराजी होती. त्यानंतर घेतलेल्या अनलॉक या सकारात्मक निर्णयाचे आम्ही स्वागत करत आहोत.
तसेच राज्य सरकारतर्फे राज्यातील व्यापार-उद्योग पूरक असे धोरण राबविण्यात यावे. पूरबाधित व्यापारी, उद्योजक व अन्य घटकांना विशेष आर्थिक मदतीचे पॅकेज देण्याचा सरकारने गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी दिली.
हॉटेलचालक हैराण
अनलॉक बाबत निर्णय झाला पण दोन डोस घेऊन 14 दिवस पूर्ण झालेले आचारी, वेटर्स व अन्य कर्मचारीच हॉटेल्स, बारमध्ये काम करू शकतील. असे डोसयुक्त कर्मचारी आणायचे कुठून, या प्रश्नाने हॉटेलचालक हैराण झाले आहेत.
ब्रेक द चेन साठी शासनाने लागू केलेल्या सुधारित मार्गदर्शक सूचना
१) लोकलट्रेन सुविधा सुरु
अ) आरोग्य सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी व अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी तसेच कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाचे दोन डोस व दुसरा डोस घेऊन १४ दिवस पूर्ण झालेल्या नागरिकांनाच लोकलट्रेन प्रवास परवानगी देण्यात आली आहे.
ब) ज्या कर्मचारी अथवा नागरिकांचे लसीकरणाचे दोन डोस आणि दुसरा डोस घेतल्यानंतर १४ दिवस पुर्ण झाले आहे त्यांना लसीकरणाच्या अंतिम प्रमाणपत्राच्या आधारे लसीकरण प्रमाणपत्र व आस्थापनांच्या ओळखपत्रासह राज्यशासनाने ठरवून दिलेल्या यंत्रणेमार्फत ऑनलाईन व ऑफलाईन प्रमाणित केलेल्या ओळखपत्र धारकानांच लोकलट्रेन प्रवासासाठी मासिक व त्रैमासिक पास देण्यात येणार आहे. संबधित ओळखपत्र मिळण्याबाबत माहिती तपशीलवारपणे संबधित अधिकाऱ्यांकडून दिली जाणार आहे.
तसेच रेल्वे तिकिट तपासनीस अर्थात टीसी यांना लसीकरण पूर्ण झाल्याचे नमूद केलेले ओळखपत्र तपासण्याचा अधिकार असेल. ज्या प्रवाशांकडे असे ओळखपत्र नसेल किंवा प्रवाशांकडून ओळखपत्र खोटे आढळल्यास त्यांच्याकडून तसेच ज्यानी खोटे प्रमाणपत्र प्रमाणीत केले असेल त्यांचेकडून रु. ५००/- इतका दंड तसेच भारतीय दंड संहिता १८६० नुसार कारवाई केली जाणार आहे.
२) हॉटेल्स, बार, रेस्टॉरंट
अ) हॉटेल्स, बारमध्ये प्रवेश करताना प्रतिक्षा कक्षात अथवा जेवण मिळेपर्यंतच्या कालावधीत मास्कचा वापर अनिवार्य केला गेला आहे. तसेच या बाबतच्या स्पष्ट सूचना हॉटेल चालकांनी उपहारगृहात लावणे आवश्यक राहिल.
फ) हॉटेल, बारमध्ये काम करणारे आचारी, वाढपे, व्यवस्थापक व स्वच्छता कर्मचान्यांसह सर्व कर्मचाऱ्यांचे कोविड प्रतिबंधक लसीकरण करणे आवश्यक राहणार आहे. ज्या कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाच्या दोन डोस आणि दुसरा डोस घेतल्यानंतर १४ दिवस पुर्ण झाले आहे असेच कर्मचारी व व्यवस्थापक उपहारगृह, बारमध्ये काम करू शकतील. तसेच या सर्व कर्मचारी व व्यवस्थापनाने उपहारगृहात मास्कचा वापर करणे बंधनकारक आहे.
क) हॉटेल व बारमध्ये विहित शारिरीक अंतराचे पालन होईल यानुसारच आसन व्यवस्था असणे आवश्यक.
ड) हॉटेल व बारमध्ये निर्जंतुकीकरणाची तसेच सॅनिटायझरची व्यवस्था असणे आवश्यक असणार आहे. हॉटेल व बार सुरु ठेवण्यास सर्व दिवस रात्री १०.०० वा. पर्यंत मुभा देण्यात आली आहे. हॉटेल व बारमधील भोजनासाठी ग्राहकांकडून शेवटची मागणी जास्तीत जास्त रात्री ९.०० वाजेपर्यंत घेतली जावी मात्र पार्सल सेवा २४ तास सुरु ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे.
३) दुकाने :
राज्यातील सर्व व्यापारी दुकाने सर्व दिवस रात्री १०.०० वा. पर्यंत सुरु ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. दुकानात काम करणाऱ्या सर्व व्यवस्थापन व कर्मचाऱ्यांचे लसीकरणाचे दोन डोस पूर्ण व दुसरा डोस झाल्यानंतर १४ दिवसाचा कालावधी पूर्ण होणे आवश्यक राहणार आहे.
४) शॉपिंग मॉल्स
राज्यातील सर्व शॉपिंग मॉल्स सर्व दिवस रात्री १०.०० वा. पर्यंत सुरु ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. तथापि, शॉपिंग मॉलमध्ये काम करणाऱ्या सर्व व्यवस्थापन व कर्मचारी आणि प्रवेश करणाऱ्या सर्व नागरिकांचेही लसीकरणाच्या दोन डोस पूर्ण व दुसरा डोस घेऊन १४ दिवस पूर्ण झालेले असणे आवश्यक आहे. तसे लसीकरण प्रमाणपत्र व त्यासमवेत फोटोसहीत ओळखपत्र प्रवेशद्वारावर दाखविणे आवश्यक राहील.
५) जिम्नॅशिअम, योगसेंटर, सलून स्पा:
वातानुकुलित तसेच विनावातानुकुलित जिम्नॅशिअम, योगसेंटर, सलून स्पा ५० टक्के क्षमतेने सर्व दिवस रात्री १०.०० वा. पर्यंत सुरु ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे.
६) इनडोअर स्पोर्टस:
इनडोअर स्पोर्ट्स असलेल्या ठिकाणी खेळाडूंचे व तेथील कर्मचारी व व्यवस्थापन यांच्या लसीकरणाचे दोन डोस पूर्ण व दुसरा डोस झाल्यानंतर १४ दिवस झालेले असणे आवश्यक राहणार आहे. या ठिकाणी खेळाडूना बॅडमिंटन, टेबलटेनिस, स्क्वॅश, पॅरलल बार, मलखांब अशाच खेळांसाठी केवळ दोन खेळाडू या मर्यादेत सुरु करण्याची मुभा देण्यात आली आहे.
७) कार्यालय / औद्योगिक / सेवाविषयक आस्थापना :
अ) सर्व शासकीय / निमशासकीय कार्यालयांचे कर्मचारी, बँक कर्मचारी, रेल्वे व म्युनिसिपल कर्मचारी व व्यवस्थापन यांचे लसीकरण पुर्ण करणे आवश्यक
ब) ज्या खाजगी व औद्योगिक आस्थापनांच्या कर्मचाऱ्यांचे व व्यवस्थापनांचे लसीकरण पुर्ण झालेले असेल त्या आस्थापनांना पूर्ण क्षमतेने सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे.
क) सर्व आस्थापनांनी गर्दी टाळण्यासाठी शक्यतो विविध सत्रात कर्मचाऱ्यांना बोलावून कामाचे व्यवस्थापन करणे आवश्यक. ज्या आस्थापना वरील कर्मचाऱ्यांना घरून काम करणे शक्य आहे अशा सर्व आस्थापनांच्या व्यवस्थापनांनी कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची मुभा द्यावी कार्यालयात काम करणे आवश्यक कर्मचाऱ्यांचा गर्दीच्या वेळी प्रवास टाळणे शक्य होईल अशा प्रकारे कार्यालयीन वेळेचे व्यवस्थापन करण्यात यावे.
तसेच खाजगी कार्यालयाना वेळेचे व्यवस्थापन करण्यासाठी कार्यालये २४ तास सूरु ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र अशा सत्र व्यवस्थापनांतर्गत कार्यालयांना एका सत्रात कार्यालयातील एकूण कर्मचारी संख्येच्या २५ टक्के उपस्थिती मर्यादित करणे आवश्यक राहणार आहे.
८) राज्यातील सर्व मैदाने, उद्याने, चौपाटया, समुद्रकिनारे स्थानिक प्रशासनाने दिलेल्या वेळेत सुरु राहतील.
९) विवाह सोहळे:
अ) खुल्या प्रांगणातील /लॉन वरील किंवा बंदिस्त मंगल कार्यालयातील विवाह सोहळे संबंधित प्रांगण / लॉन / मंगल कार्यालय / हॉटेल मधील आसन व्यवस्थेच्या ५० टक्के क्षमतेने व कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे संपूर्ण पालन होईल या अटीवर मंगल कार्यालये सुरु ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे.
\
ब) खुल्या प्रांगण / लॉन मध्ये होणाऱ्या विवाह सोहळ्यास उपस्थितांची संख्या प्रांगण किंवा लॉन क्षमतेच्या ५० टक्के परंतु जास्तीत जास्त २०० व्यक्ती या मर्यादेत राहणार आहे.
क) बंदिस्त मंगल कार्यालय /हॉटेलमध्ये उपस्थितांची संख्या क्षमतेच्या ५० टक्के परंतु जास्तीत जास्त १०० व्यक्ती या मर्यादित असेल.
मात्र कोणत्याही परिस्थीतीत कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन केले जात आहे याची खातरजमा करण्यासाठी व्हिडिओ रेकॉर्डिंग करणे व आवश्यकतेनुसार सक्षम प्राधिकान्याला तपासणीसाठी उपलब्ध करुन देणे आवश्यक राहिल. या निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्यांवर तसेच संबंधित हॉटेल/ कार्यालयांवर दंडनीय कारवाई तसेच संबंधित हॉटेल / मंगल कार्यालयाचा परवाना रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येईल.
तसेच मंगल कार्यालय, हॉटेल, लॉन व्यवस्थापन, भोजन व्यवस्थापन, बँडपथक, भटजी, फोटोग्राफर्स अशा विवाह व्यवस्थेशी संबंधीत सर्व संलग्न संस्था यामधील व्यवस्थापक व कर्मचारी यांचेही लसीकरण पुर्ण होऊन दुसरा डोस घेतल्यानंतर १४ दिवस पुर्ण होणे अनिवार्य राहील व त्यानुसार ओळखपत्रासह लसीकरण प्रमाणपत्र सोबत असणे आवश्यक राहील.
१०) सिनेमागृहे व मल्टिप्लेक्स :
राज्यात सिनेमागृह, नाट्यगृह, मल्टिप्लेक्स ( स्वतंत्र तसेच शॉपिंग मॉलमधील ) पुढील आदेशापर्यंत बंद राहतील.
११) धार्मिक स्थळे :
राज्यातील सर्व धार्मिक स्थळे पुढील आदेशापर्यंत नागरिकांसाठी बंद राहतील.
१२) आंतरराज्य प्रवास:
ज्या नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. त्या नागरिकांना बाहेरच्या राज्यातून महाराष्ट्र राज्यात प्रवेश करण्यासाठी आरटीपीसीआर चाचणीची आवश्यकता नसेल. अन्य प्रवाशांसाठी ७२ तास पुर्वीची आरटीपीसीआर चाचणी निगेटीव्ह किंवा १४ दिवस विलगीकरण आवश्यक राहिल.
१३) कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून राज्यात गर्दी व्यवस्थापन करण्याबाबत केंद्र शासनाने तसेच सर्वोच्च न्यायालयाने निर्देशित केले आहे. यास्तव गर्दी, जमाव टाळण्यासाठी वाढदिवस, राजकीय, धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम, निवडणूक प्रचार सभा, रॅली, मोर्चे, इ. वरील निर्बंध कायम ठेवण्यात आले आहे.
१४) मेडीकल ऑक्सीजनची उपलब्धता मर्यादीत असल्याने, जर राज्यातील रुग्णसंख्या वाढल्यास व कोविङ रुग्णांच्या उपचारासाठी प्रतिदिन ७०० मे. टन किंवा व त्यापेक्षा जास्त ऑक्सीजन लागत असल्यास संपूर्ण राज्यात तात्काळ पूर्णपणे लॉकडाऊन घोषित करुन त्यानुसार कठोर निर्बंध लागू करण्यात येणार आहेत.
१५) राज्यातील सर्व नागरिकांना कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना जसे की, मास्कचा वापर, हातांची स्वच्छता, शारिरीक अंतराचे पालन, इतरत्र थुंकण्यास प्रतिबंध, इ. सर्व निर्बंधांचे पालन करणे अनिवार्य राहणार आहेत.
१६) सर्व दुकाने, कार्यालये, औद्योगिक आस्थापना, उपहारगृहे, बार व मॉल मालक व्यवस्थापनाने त्यांचे आस्थापनेवर कार्यरत असलेल्या व्यवस्थापक तसेच कर्मचाऱ्यांचे दोन डोस पुर्ण होऊन १४ दिवस झाल्याची खातरजमा करावी व या कर्मचाऱ्यांची यादी, लसीकरण माहिती, प्रमाणपत्रासह तयार ठेवावी व सक्षमप्राधिकाऱ्यांनी तपासणीसाठी मागणी केल्यास त्यांना उपलब्ध करुन द्यावी.
१७) दुकाने, उपहारगृहे, बार, मॉल्सचे, कार्यालये, औद्योगिक आस्थापना यांचे नियतकालीक निर्जतूकीकरण व सैनीटायझेशन करण्याची जबाबदारी संबंधीत मालकाची व व्यवस्थापनाची असणार आहे. तसेच, यामध्ये कर्मचारी तसेच ग्राहकांचे तापमान घेण्यासाठी इन्फ्रारेड, कॉन्टॅक्टलेस थर्मामिटर याची व्यवस्था करणे आवश्यक आहे. तसेच यामध्ये मास्क डिस्पेंसर व बायोमेडीकल वेस्ट जमा करण्याची व त्याचे विल्हेवाटीची जबाबदारी संबंधीत आस्थापनांची असणार आहे.