सांगली; पुढारी ऑनलाईन : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगली येथील भिलवडी पूरग्रस्त भागाला भेट दिली. अजित पवार यांनी भिलवडी (ता. पलूस, जि. सांगली) येथील पुरग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर निवारा केंद्राला भेट दिली.
त्याचबरोबर त्यांनी माळवाडी, कवलापूर, दामाणी हायस्कूल येथील पूरग्रस्त निवारा केंद्राला भेट देऊन पूरग्रस्तांशी साधला संवाद साधला. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत माध्यम प्रतिनिधींना माहिती दिली. यावेळी पालकमंत्री जयंत पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, सांगलीच्या ४ तालुक्यातील १०३ गावे महापूराने बाधित झाली आहेत. एनडीआरफचे दोन पथके तैनात करण्यात आली असून सांगलीत एकूण ११० जवान तैनात आहेत. आहेत. जिल्ह्यात ७०० शासकीय छावण्या सुरु अस्ल्याचे त्यांनी सांगीतले.
ते पुढे म्हणाले, सांगली, मिरज कुपवाड महापूराचा फटका बसला आहे. राष्ट्रवादीचे आमदार आणि खासदार एक महिन्याचे वेतन पुरग्रस्तांना देणार आहेत. पुरग्रस्तांच्या मदतीसाठी राज्यातील नागरिकांनी पुढे यावे असे आवाहनही यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी केले.
धरण क्षेत्रात कोणत्याही प्रकारची वृक्षतोड नाही. कोयना धरणात मोठ्या प्रमाणात पाणी अडवण्यात आलं आहे. सांगलीचा महापूर मनुष्यनिर्मित नाही. तसेच सांगली-कोल्हापूरच्या महापुराचा कर्नाटकातील अलमट्टी धरणाशी संबंध नसल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
यावेळी पूराचा वारंवार फटका बसणाऱ्या घरांचे पुनर्वसन करण्यासाठी जागेची उपलब्धता तातडीने तपासा अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
भिलवडी गावातील पूरग्रस्तांच्या व्यथा अजित पवारांनी ऐकल्या. नंतर त्यांच्या पुनर्वसन आणि मदतीसाठी चांगला मार्ग काढण्याचे आश्वासन दिले.
संकटाच्या काळात राज्य सरकार प्रत्येक नागरिकाच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
भिलवडी बाजारपेठेची त्यांनी बोटीतून पाहणी केली.
भिलवडी येथील बाजारपेठ पूर्णपणे पाण्याखाली आहे. यावेळी जलसंपदा मंत्री जयंत पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम उपस्थित होते.
जयंत पाटील, विजय वडेट्टीवार, विश्वजीत कदम यांच्यासह लोकप्रतिनिधींनी भिलवडी परिसरातील पूरग्रस्त भागाला भेट दिली.
स्थलांतरितांच्या निवारा केंद्रांना भेटी दिल्या. पूरग्रस्तांशी संवाद साधला व परिसराची पाहणी केली.