Latest

‘अ’चेतन चेतन!

Arun Patil

क्रिकेट हा भारतातील सर्वाधिक लोकप्रिय खेळ आहे, इतका की कौतुकाने त्याला धर्माचे स्थान दिले जाते. या खेळाप्रती क्रिकेट चाहते प्रचंड संवेदनशील असतात आणि मनाविरुद्ध घडलेल्या कोणत्याही गोष्टीवर तातडीने आणि तीव्र प्रतिक्रिया देत असतात. त्यामुळे क्रिकेट नियामक मंडळापासून क्रीडा मंत्रालयापर्यंत सगळ्या घटकांना या खेळासंदर्भातील कोणत्याही गोष्टीची तातडीने दखल घ्यावी लागते. भारतीय निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांना त्याचमुळे आपला राजीनामा द्यावा लागला आहे. एका वृत्तवाहिनीने केलेले स्टिंग ऑपरेशन समोर आल्यानंतर चेतन शर्मा वादाच्या भोवर्‍यात सापडले होते आणि काही धक्कादायक बाबी त्यांच्या बोलण्यातून उघड झाल्यामुळे त्यांना राजीनामा देण्यावाचून पर्यायसुद्धा नव्हता.

क्रिकेट जगतातील मॅच फिक्सिंगचा खेळ असाच काही वर्षांपूर्वी जगासमोर आला होता आणि अशाच काही स्टिंग ऑपरेशन्सनी त्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. मोहम्मद अझरुद्दीनपासून मनोज प्रभाकर, अजय जडेजा अशा अनेक क्रिकेटपटूंची कारकीर्द त्यामुळे संपुष्टात आली. डिजिटल मीडियाच्या आजच्या जमान्यात तर अत्यंत छोटी गोष्ट मोठी करून सादर केली जाते. चाहते, दर्शकांचे कुतूहल चाळवले जाते.

सिनेमा आणि क्रिकेट ही दोन अशी क्षेत्रे आहेत की, तिथली छोट्यातील छोटी घटनाही लोकांचे लक्ष वेधून घेत असते. अशा काळात भारतीय निवड समितीचे अध्यक्ष काही गोष्टी मोकळेपणाने बोलत असतील आणि ते छुप्या कॅमेर्‍यात कैद झाले असेल, तर ते सनसनाटी ठरल्यावाचून राहत नाही. चेतन शर्मा यांची ही वक्तव्ये अशाच प्रकारे सनसनाटी ठरली आणि त्याची परिणती कशामध्ये होणार, याचा अंदाज त्याचवेळी आला होता. त्यानुसार शर्मा यांनी निवड समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. विश्वचषकामध्ये पहिल्या हॅट्ट्रिकचा बहुमान चेतन शर्मा यांनी 1987 मध्ये मिळवला होता. आतापर्यंत विश्वचषकामध्ये नऊ वेळा हॅट्ट्रिक झाली आहे. परंतु, त्याची सुरुवात चेतन शर्मा यांनी केली आहे.

भारत हा फक्त फिरकी गोलंदाजांचा देश म्हणून ओळखला जात असताना मध्यमगती गोलंदाज कपिलदेव हाच इथला जलदगती गोलंदाज मानला जात असतानाच्या काळात चेतन शर्माचे भारतीय क्रिकेट संघात पदार्पण झाले होते. त्यांची कारकीर्द फार देदीप्यमान नसली, तरी अनेक चांगल्या खेळी त्यांनी केल्या. भारतीय निवड समितीचे अध्यक्ष बनल्यानंतर त्यांनी अत्यंत जबाबदारीने काम केल्याचे दिसून येते. परंतु, सनसनाटी पत्रकारितेने त्यांच्या अध्यक्षपदाच्या दुसर्‍या टर्मचा अकाली बळी घेतला. या स्टिंगमधून त्यांचे भ्रष्ट वर्तन कुठेही समोर आलेले नाही किंवा स्वतःला खाली मान घालावी लागेल, अशा कोणत्याही गोष्टीची कबुली त्यांनी दिलेली नाही. कुणाचे चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्नही त्यांनी केलेला नाही, हे लक्षात घ्यावे लागते.

चेतन शर्मा यांची निवड समिती अध्यक्षपदाची तीन वर्षांची कारकीर्द पूर्ण झाली असताना 7 जानेवारी 2023 रोजी त्यांची अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली होती. त्यानंतर अवघ्या चाळीस दिवसांतच कथित स्टिंगमुळे त्यांना पायउतार व्हावे लागले. त्यांचे जे स्टिंग समोर आले, त्यामध्ये भारतीय संघाशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे खेळाडूंच्या फिटनेससंदर्भात त्यांनी दिलेली माहिती गंभीर स्वरूपाची आहे. दुखापतीनंतर पूर्ण तंदुरुस्त नसतानाही संघात पुनरागमन करण्यासाठी काही भारतीय क्रिकेटपटू विशिष्ट प्रकारचे इंजेक्शन घेत असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला होता.

डोपिंग टेस्टमध्येही या इंजेक्शनचा मागमूस लागत नसल्याचा दावा त्यांनी केला. ऐंशी टक्के तंदुरुस्त असलेले खेळाडू इंजेक्शन घेऊन शंभर टक्के तंदुरुस्त असल्याचे भासवतात, असे त्यांनी म्हटले. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने दुखापत लपवून भारतीय संघात येण्याचा प्रयत्न केला. तशा प्रकारे तो एक सामना खेळला; परंतु त्यात त्याचे प्रदर्शन सुमार दर्जाचे झाले. त्यानंतर तपासणीअंती त्याची दुखापत गंभीर असल्याचे समोर आल्याचे शर्मा यांनी म्हटले आहे. स्टिंग ऑपरेशनमधील आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे रोहित शर्मा-सौरभ गांगुली आणि विराट कोहली यांच्यासंदर्भातील वक्तव्य.

सौरभ गांगुली हे बीसीसीआयचे अध्यक्ष होते, तर रोहित आणि विराट हे भारतीय संघातील प्रमुख खेळाडू आहेत. चेतन शर्मा यांच्या स्टिंगमधील दाव्यानुसार गांगुली यांनी कधी रोहित शर्मा यांना साथ दिली नाही; परंतु त्यांना विराट कोहलीही आवडत नव्हता. परंतु, गांगुली यांच्यामुळेच आपले कर्णधारपद गेल्याची विराटची पक्की समजूत झाली आहे. विराट आणि रोहित यांच्यामध्ये कोणताही वाद नाही; परंतु दोघेही मोठे खेळाडू असल्यामुळे त्यांचा अहंकार अडचणीचा ठरतो, असेही चेतन शर्मा यांनी म्हटले असून त्यांची तुलना धर्मेंद्र आणि अमिताभ या दोन मोठ्या अभिनेत्यांतील स्पर्धेशी केली. खेळाडू उत्तेजक इंजेक्शन घेतात आणि ती डोपिंग टेस्टमध्ये सापडत नाहीत, हा शर्मा यांचा दावा सनसनाटी आणि गंभीर स्वरूपाचा आहे.

बाकीच्या ज्या गोष्टी त्यांच्या स्टिंगमधून समोर आल्या, त्यामुळे भारतीय क्रिकेटचे फारसे नुकसान होणार नसले, तरी एवढ्या जबाबदारीच्या पदावरील व्यक्तीने कुणाहीजवळ इतक्या सैलसरपणे बोलणे योग्य तर नाहीच शिवाय त्या पदाच्या प्रतिष्ठेलाही बाधा आणणारे आहे. शर्मा यांनी निकटवर्तीयांशी विश्वासाने बोलावे, तशा या गप्पा मारलेल्या दिसतात; परंतु या कथित निकटवर्तीयानेच त्यांचा घात केला. त्यामुळे त्यांचा बळी तर गेलाच शिवाय त्याचा फटका भविष्यात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना बसू शकतो. क्रिकेटच्या बाजारात खूप काही घडत असते. त्यात चेतन शर्मा यांच्या राजीनाम्याचीही नोंद झाली. क्रिकेटच्या चेहर्‍यामागील कटू सत्यही समोर आले. क्रिकेटच्या निकोप वाढीसाठी ते निश्चितच भूषणावह आणि समर्थनीय नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT