Latest

अकरावी प्रवेश प्रक्रियेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर

Arun Patil

मुंबई/पुणे ; पुढारी वृत्तसेवा : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने यंदाच्या अकरावी प्रवेश प्रक्रियेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले असून, 17 मे पासून विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठीचा पहिला भाग भरता येईल तर दुसरा भाग दहावीचा निकाल लागल्यानंतर भरता येईल.

1 ते 14 मे या कालावधीत म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्टीतच विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरण्याचा सराव करता येईल. 17 मे ते दहावीचा निकाल लागेपर्यंत नोंदणी व भरलेला अर्ज तपासता येईल. दहावी निकालानंतर पुढील पाच दिवस अर्जाचा भाग दोन भरणे सुरू राहील.

यंदा प्रवेशाच्या नियमित तीन आणि त्यानंतर एक विशेष फेरी राबविण्यात येणार आहे, फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह अर्थात 'एफसीएफएस' फेरीऐवजी प्रतीक्षा यादी लावण्यात येणार असल्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर यांनी सांगितले.

दहावी, बारावीचा निकाल वेळेवरच

औरंगाबाद ; पुढारी वृत्तसेवा : कोरोना काळातही शिक्षण विभागाने सर्वतोपरी प्रयत्न करून, दहावी-बारावीचा निकाल वेळेवर लावला होता. यंदाही वेळेत निकाल लावणार असल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

मंत्री गायकवाड म्हणाल्या, की दहावी, बारावीचा निकाल वेळेवर लागेल. मागच्या वेळीही कोरोनामुळे अशीच परिस्थिती होती. कोरोना काळातही पोस्ट ऑफिस, शाळांमध्ये अडकलेले पेपर जमा करून, शिक्षकांच्या घरी तपासणीसाठी पाठविले होते. यंदाही निकाल वेळेवर लावण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. बारावीचा निकाल जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आणि दहावीचा निकाल तिसर्‍या चौथ्या आठवड्यात लागतो. त्यासंदर्भात पुढील आठवड्यात बैठक होणार आहे, पण वेळेत निकाल लावण्याचा आमचा प्रयत्न आहे.

शिक्षकांनी मुख्यालयात राहिले पाहिजे, यावर विचारले असता, त्या म्हणाल्या, शिक्षकांनी वेळेवर आले पाहिजे, शाळेत वेळ दिला पाहिजे, मोठ्या प्रमाणात त्यांनी काम केले पाहिजे. त्यांची राहण्याची सोय असेल, तर मुख्यालयात राहू शकतात.

कोरोनाच्या काळातही शिक्षक जिथे राहत होते, तिथे शिकवले. सगळ्यांचे मत आहे, त्यांनी मुख्यालयात राहावे, परंतु परिस्थिती बघूनच काही निर्णय घ्यावे लागतात.

शाळांचे वीज कनेक्शन कट करणार नाही

ऊर्जा विभागाला यापूर्वी 7 कोटी, तर यंदा 14 कोटी रुपये दिलेले आहेत. शाळांमध्ये घरगुती वीज कनेक्शन आहे की व्यावसायिक, याबाबत ऊर्जा आणि शिक्षण विभागाच्या वतीने सर्व शाळांचा सर्व्हे करण्यात येईल, घरगुती कनेक्शन कन्व्हर्ट करण्याचे काम करण्यात येईल. कुठल्याही शाळेचे वीज कनेक्शन कट करू नये, असा निर्णय झालेला आहे. जे कट केलेले असतील, तर ऊर्जा विभागाच्या अधिकार्‍यांशी बोलून ते कनेक्शन त्वरित पुन्हा जोडण्यात येईल.

SCROLL FOR NEXT