Latest

अंबरनाथमध्ये ठाकरे गटाचे अस्तित्व आटोपले; ठाकरे गटाच्या शहर प्रमुखासह सारे शिवसेनेत

दिनेश चोरगे

अंबरनाथ; पुढारी वृत्तसेवा :  निष्ठावंत म्हणवणाऱ्या उद्धव ठाकरे गटातील शिवसैनिकांनी मागील सहा महिने शहर शाखा आपल्या ताब्यात ठेवून शिंदे गटाला गद्दार संबोधित होते. मात्र आता याच निष्ठावंतांनी आपली निष्ठा खुंटीला टांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने अंबरनाथमध्ये उद्धव गटाचे अस्तित्व आटोपले असल्याची चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे स्वतःला निष्ठावंत म्हणवणाऱ्यांनीच उद्धव व आदित्य ठाकरे यांचे फोटो शहर शाखेतून बाजूला केले.

अंबरनाथ शहरात मागील २५ वर्षांपासून शिवसेनेची एक हाती सत्ता आहे. मात्र मागील सहा महिन्यांपूर्वी घडलेल्या राजकीय भूकंपामुळे शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारून उद्धव ठाकरे यांनाच आव्हान दिले व भारतीय जनता पक्षाच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेनेवर आपले वर्चस्व स्थापन करून शिवसेनेचे धनुष्यबाण देखील आपल्या पदरात पाडून घेतले. त्यामुळे आता शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे असे समीकरण पुढे आले. या सगळ्या राजकीय घडामोडींमुळे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकमेकांसमोर दंड थोपटून उभे आहेत. अश्यातच मागील सहा महिने उद्धव ठाकरे यांच्यासोबत निष्ठावंत म्हणून शिवसेनेचा एक गट कायम राहिला होता.

उद्धव ठाकरे गटाचा शहर प्रमुख म्हणून श्रीनिवास वाल्मिकी यांनी धुरा सांभाळली. त्यामुळे या गटाने शहर शाखा देखील आपल्या ताब्यात ठेवली होती. विशेष म्हणजे ही शाखा ताब्यात घेण्यात शिंदे गटाचे कुणीही पुढे सरसावले नव्हते. उद्धव ठाकरे गटाच्या या शिवसैनिकांनी शिंदे गटाला संधी मिळेल तेव्हा आव्हान दिले व गद्दार देखील संबोधले. त्यासाठी त्यांना पोलीस ठाण्याची पायरी देखील चढावी लागली. असे असताना राजकीय घडामोडीत अचानक कलाटणी आली व उद्धव गटाच्या शहर प्रमुखासह सर्वच पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेची कास धरली व शिवसेना शहर शाखेतून उद्धव, आदित्य ठाकरे यांचे फोटो देखील काढून टाकले. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांच्या गटाचे अस्तित्व संपुष्टात आल्याचे बोलले जात आहे.

ठाकरे गटाचे सर्व पदाधिकारी वाळेकरांचे कट्टर समर्थक

उद्धव ठाकरे गटाचे सर्व पदाधिकारी हे येथील माजी नगराध्यक्ष व शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांचे कट्टर समर्थक आहेत. वाळेकर यांनी वेट अँड वॉचच्या भूमिकेतून शिंदे गटाची कास धरली. त्यानंतर तब्बल सहा महिन्यानंतर वाळेकर यांनी उद्धव गटाच्या ताब्यात आलेल्या शिवसेना शहर शाखेत प्रवेश केला व उद्धव गट पुर्णतः मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेत विलीन झाला.

SCROLL FOR NEXT