Latest

अंतराळात पहिल्या रशियन चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण

Arun Patil

मॉस्को : अंतराळात पहिल्या रशियन चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण करण्यात आले. चित्रीकरणासाठी गेलेली संपूर्ण टीम आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून पृथ्वीकडे रवाना झाली आहे.

हा चित्रपट रशियन निर्माता तयार करत असून, त्याचे अंतराळातील चित्रीकरण पूर्ण झाले आहे. चित्रपटातील काही दृश्ये आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात चित्रीत करण्यात आली. यासाठी एक पथक अंतराळ स्थानकावर गेले होते. 12 दिवस अंतराळात चित्रीकरण करून हे पथक रविवारी (17 ऑक्टोबर) आंतरराष्ट्रीय प्रमाण वेळेनुसार 1 वाजून 15 मिनिटांनी आयएसएसवरून पृथ्वीवर येण्यास रवाना झाले.

अंतराळात चित्रीकरण करण्यात आलेल्या या चित्रपटाचे नाव 'चॅलेंज' आहे. याच चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी अभिनेत्री युलिया पेरसिल्ड (वय 37), दिग्दर्शक क्लिम शिंपेको (वय 38) आणि अनुभवी अंतराळ यात्री ओलेग नोवित्स्की हे अंतराळात गेले होते.

पेरसिल्ड, शिंपेको व ओलेग यांना घेऊन 'सोयुझ' अंतराळ यान पृथ्वीच्या दिशेने येत आहे. हे यान कझाकिस्तानमध्ये उतरणार आहे. हे त्रिकूट 5 ऑक्टोबर 2021 रोजी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले होते. 37 वर्षीय अभिनेत्री पेरसिल्ड ही 'चॅलेंज'मध्ये एका सर्जनची भूमिका करत आहे.

या चित्रपटातील कथेप्रमाणे अंतराळ स्थानकावरील एका सदस्याला वाचविण्यासाठी पेरसिल्डला आयएसएसवर जावे लागते. या आजारी क्रू सदस्याची भूमिका अनुभवी अंतराळवीर ओलेग नोवेस्की पार पाडत आहे. ओलेगच्या अनुभवाची चित्रपटाला चांगलीच मदत झाली. यामुळे विनाअडथळा चित्रीकरण पूर्ण झाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT