Latest

इचलकरंजीत ‘झिका’, तर केरळमध्ये ‘निपाह’ माजवतोय दहशत!

दिनेश चोरगे

कोल्हापूर :  दोन वर्षांहून अधिक काळ संपूर्ण जगाला दहशतीखाली ठेवणार्‍या कोरोना विषाणूच्या मुसक्या आवळण्यात यश आले असताना भारतात 'झिका' आणि 'निपाह' या विषाणूबाधित रुग्णांच्या आढळाने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. याविषयी भारतीय आयुर्विज्ञान संशोधन संस्थेने (आयसीएमआर) कंबर कसली आहे. नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहून आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधला, तर या विषाणूंचा मुकाबला करणे शक्य असल्याचे मत वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त होत आहे. इचलकरंजीमध्ये 'झिका' विषाणूबाधित तीन रुग्ण आढळून आले. यामध्ये एका वैद्यकीय व्यावसायिकाचाही समावेश आहे. संबंधितांच्या रक्ताचे नमुने आयसीएमआरकडे पाठविले होते. त्यांच्या तपासणीत 'झिका' आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली. याविषयी अधिक संशोधन आणि उपाययोजनांविषयी मार्गदर्शन करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आयसीएमआरच्या तज्ज्ञांचे एक पथक रवाना करण्याचा निर्णय घेतला. मंगळवारी इचलकरंजीत आणखी एक रुग्ण 'झिका'बाधित असल्याचे आढळल्याने चिंता वाढली आहे.

 'झिका'चा प्रसार एडिस एजिप्ती आणि एडिस अ‍ॅल्बोपिक्टस् या डासांच्या दोन प्रजातींपासून प्रसारित होतो. याच प्रजातींपासून डेंग्यू आणि चिकुनगुणियाचेही विषाणू प्रसारित होतात. स्वच्छ पाण्यामध्ये या डासांची उत्पत्ती होते. गेली काही वर्षे या डासांनी डेंग्यूच्या विषाणूंचा प्रसार करून महाराष्ट्राला जेरीस आणले होते. आता 'झिका'ला सोबत घेऊन ते स्वार होऊ पाहात आहेत. त्यांचा अटकाव करण्यासाठी स्वच्छ पाण्याचे साठे नष्ट करणे आणि लक्षणे आढळल्यास तातडीने आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधणे या गोष्टी अनिवार्य आहेत. उपचाराने हा रोग बरा होत असल्याने नागरिकांनी काळजीऐवजी सतर्क होणे आवश्यक आहे.

इचलकरंजीत 'झिका'चा आढळ समोर आल्यानंतर केरळमध्ये कोझिकोड जिल्ह्यात 'निपाह' विषाणू आढळून आला. एकाच कुटुंबात दोन व्यक्तींना या विषाणूंची बाधा झाली. यावर आयसीएमआरने शिक्कामोर्तब केल्यानंतर 30 ऑगस्ट रोजी यातील पहिल्या रुग्णाचा मृत्यू झाला, तर सोमवारी दुसरा रुग्ण दगावला. त्यापाठोपाठ त्याच घरात आणखी दोन रुग्णही सापडल्याने केरळ सरकारच्या आरोग्य विभागाने सतर्कता जारी केली. या गंभीर घटनेची नोंद घेत केंद्राने आयसीएमआरच्या शास्त्रज्ञांचे दुसरे पथक पाठविले आहे. केरळचे राज्यमंत्री पिनराई विजयन यांनी नागरिकांना घाबरून जाण्याची गरज नाही, असे स्पष्ट केले आहे. या दोन्ही रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीत कमालीची सुधारणा दिसते आहे, असा दिलासा देताना त्यांनी केरळ सरकारच्या आरोग्य विभागाने तयार केलेल्या कृती आराखड्याला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

'निपाह' हा विषाणू, संबंधित विषाणूने बाधित असलेल्या वटवाघूळ, डुक्कर आदी प्राण्यांच्या थेट संपर्कात अथवा त्यांचे रक्त, लघवी आणि लाळीमुळे बाधित होणारे अन्न, फळांच्या सेवनाने प्रसारित होतो. अशा प्राण्यांचा वा त्यांच्या संपर्कात येणार्‍या अन्न व फळांचा संपर्क टाळला, तर त्यावर मात करता येणे शक्य आहे.

झिकाची लक्षणे

ताप, डोकेदुखी, सांधेदुखी, डोळे लालसर होणे, त्वचेवर रॅश उठणे आणि थकवा जाणवणे.

निपाहची लक्षणे

3 ते 14 दिवस ताप, डोकेदुखी, श्वसनाचा त्रास, खोकला, घशात खवखव, मेंदूला सूज येणे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT