Latest

Yuvraj Singh vs Dhoni : युवराज सिंगचा धोनीसोबतच्या नात्याबद्दल मोठा खुलासा, म्हणाला; ‘तो माझा खास मित्र नाही’

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Yuvraj Singh vs Dhoni : टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि माजी अष्टपैलू युवराज सिंग यांच्या नात्याबाबत सोशल मीडियावर अनेकदा वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा होत असतात. धोनीमुळेच युवराज सिंगची कारकीर्द लवकर संपुष्टात आली असे अनेकांचे मत आहे. पण आता खुद्द युवराज सिंग धोनी आणि त्याच्या नात्याबद्दल कॅमेऱ्यासमोर उघडपणे बोलला आहे. युवीने एका यूट्यूबरला दिलेल्या मुलाखतीत अनेक मोठ्या गोष्टींचा खुलासा केला आहे.

युवराज धोनीबद्दल काय म्हणाला? (Yuvraj Singh vs Dhoni)

युवराज सिंगने युट्युब चॅनल टीआरएस क्लिप्सवरील संभाषणात धोनीसोबतच्या नात्याबद्दल सांगितले की, 'मी आणि माही जवळचे मित्र नाही. क्रिकेटमुळे आम्ही मित्र होतो, एकत्र खेळायचो. माहीची जीवनशैली माझ्यापेक्षा खूप वेगळी होती, त्यामुळे आम्ही कधीच जवळचे मित्र नव्हतो. आम्ही फक्त क्रिकेटमुळे मित्र होतो. जोपर्यंत मी आणि माही मैदानात होतो, तोपर्यंत आम्ही टीम इंडियासाठी 100 टक्के पेक्षा जास्त योगदान दिले. तो संघाचा कर्णधार आणि मी उपकर्णधार होतो. जेव्हा मी टीम इंडियात एन्ट्री घेतली तेव्हा मी चार वर्षांनी ज्युनियर होतो. जेव्हा तुम्ही कर्णधार आणि उपकर्णधार असाल तेव्हा निर्णयांमध्ये मतभेद असतील.'

'धोनीचे निर्णय मला आवडले नाहीत'

'कधीकधी धोनीने असे निर्णय घेतले जे मला आवडले नाहीत, तर कधी मी त्याला न आवडणारे निर्णय घेतले. असे प्रत्येक संघात घडते. जेव्हा मी माझ्या करिअरच्या शेवटच्या टप्प्यात होतो, तेव्हा मला माझ्या करिअरबाबत अस्पष्टता दिसत होती, तेव्हा मी धोनीला सल्ला विचारला. त्यावर माहीने मला निवड समिती सध्या तुझ्याबद्दल विचार करत नाही, असे सांगितले. त्यावेळी मी समजून गेलो की, मी समजून गेलो की खरे चित्र काय आहे. ही गोष्ट 2019 च्या विश्वचषकापूर्वीची आहे,' असेही युवी पुढे म्हणाला. (Yuvraj Singh vs Dhoni)

'माहीने मला अर्धशतक पूर्ण करण्यास मदत केली'

युवराज पुढे म्हणाला की, 'एकाच संघातील खेळाडूंनी एकमेकांचे चांगले मित्र असण्याची गरज नाही, परंतु संघासाठी जेव्हा मैदानात उतरता तेव्हा आपले सर्वोत्तम देणे महत्त्वाचे आहे. त्यावेळी अहंकार मागे ठेवावा. एकदा माही जखमी झाला होता आणि मी त्याच्यासाठी रनर म्हणून मैदानात उतरलो होतो. त्यावेळी तो शतकाच्या उंबरठ्यावर होता. त्याला फक्त 10 धावांची गरज होती. त्यामुळे मी धोनीला जास्तीत जास्त स्ट्राईक मिळावे यासाठी प्रयत्न केला. त्याचप्रमाणे, जेव्हा मी विश्वचषक सामन्यात फलंदाजी करत होतो, तेव्हा मी नेदरलँड्सविरुद्ध 48 धावांवर होतो. त्यावेळी माहीने मला अर्धशतक पूर्ण करण्यास मदत केली.'

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT