Latest

नोकरी लावून देतो म्हणत तरुणांना लाखोंचा गंडा; सैराटमध्ये प्रिन्सची भूमिका साकारणाऱ्या सुरज पवारचा गुन्ह्यात सहभाग

अमृता चौगुले

राहुरी, पुढारी वृत्तसेवा: मंत्रालयात नोकरी लावून देण्याचं आमिष दाखवत तरुणांना लाखों रूपयांचा गंडा घालणाऱ्या टोळीचा राहुरी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. विशेष म्हणजे लोकप्रिय मराठी सैराट चित्रपटातील प्रिन्सची भूमिका साकारणारा अभिनेता सुरज पवार देखील यामध्ये आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे. तो आता राहुरी पोलिसांच्या रडारवर आहे. यामध्ये प्रसिद्ध निर्माते नागराज मंजुळे यांच्या नावाचा देखील आरोपींनी वापर केल्याने या गुन्ह्यामध्ये नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे.

नेवासा तालुक्यातील भेंडा येथील महेश बाळकृष्ण वाघडकर यांना ३ सप्टेंबर रोजी एक फोन आला. समोरची व्यक्ती म्हणाला की, मी श्रीरंग कुलकर्णी सामाजिक न्याय विभाग मंत्रालयातून बोलतोय. आमच्या विभागात कोरोनामुळे दोन जणांचा मृत्यु झाला आहे. त्यांची सहाय्यक कक्षाधिकारी म्हणून जागा खाली असून त्या भरायच्या आहेत. तेथे तुम्ही इच्छुक असाल तर तुम्हाला पाच लाख रुपये द्यावे लागतील. काम होण्यापुर्वी दोन लाख आणि जेव्हा तुमच्या हातात ऑर्डर येईल तेव्हा तीन लाख रुपये द्या. त्यामुळे, रोजगाराचा प्रश्न असल्याने वाघडकर यांनी पैसे देण्यास सहमती दर्शविली. तोतया श्रीरंग कुलकर्णी हा तेथे आला, तेव्हा तो राहुरी विद्यापीठाच्या व्हीआयपी गेस्ट हाऊस येथे थांबला होता. त्याच्याकडे काही बनावट कार्ड असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र जेव्हा आरोपी आणि फिर्यादी हे भेटले तेव्हा आरोपीच्या काही गोष्टींचा वाघडकर यांना संशय आला. तोतया श्रीरंग कुलकर्णी याने आपली फसवणुक केली आहे, असे लक्षात आल्याने त्यांनी रक्कम देण्याचे टाळले आणि आरोपीच्या विरोधात तक्रार दाखल केली. राहुरी पोलिसांनी चौकशी केली असता, श्रीरंग कुलकर्णी नावाचा व्यक्ती मंत्रालयात नसल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी त्यास बेड्या ठोकल्या आहेत.

यामध्ये बनावट शिक्के आणि शासकीय हुबेहूब कागदपत्रे या आरोपींनी बनवले होते. यामधील आरोपी दत्तात्रय अरूण शिरसागर, आकाश विष्णु शिंदे,ओमकार नंदकुमार तरटे, सर्व राहणार ता. संगमनेर यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. यामध्ये सैराट चित्रपटातील प्रिन्सची भूमिका साकारणारा सुरज पवार देखील सहभागी असल्याचं काही आरोपींकडून सांगण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणामध्ये दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या नावाचा वापर आरोपीने केल्याने तपासाची दिशा आता काय वळण घेणार, हे बघावं लागणारं आहे. पो.नि. प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सज्जन नाऱ्हेडा करत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT