Latest

पिंपरखेड : बिबट्याच्या हल्यात तरुण जखमी; बेट भागातील नागरीक बिबटयाच्या दहशतीखाली

अमृता चौगुले

पिंपरखेड; पुढारी वृत्तसेवा: शिरूर तालुक्यातील जांबुत येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना पिंपरखेड (ता. शिरूर ) येथे २ सप्टेंबर रोजी पहाटे शेतमजुर संजय दुधावडे या तरुणावर बिबट्याने हल्ला केला. तरूणाच्या पायाला चावा घेतल्याने दुखापत झाली आहे. या जीवघेण्या हल्ल्याच्या घटनेने बेट भागातील नागरिक बिबट्याच्या दहशतीखाली आले असून मानवी जीवन धोक्यात आले आहे.

पिंपरखेड-जांबूत रस्त्याच्या बाजूला अरुण बाळू ढोमे यांच्या शेतातील शेतमजूर संजय नाना दुधवडे (रा .मुळ गाव पळशी, ता. पारनेर) हा पहाटे ३.३० वाजता लघुशंका करुन घरात जाताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने मागुन हल्ला केला. प्रसंगावधान राखत तरुण पटकन झोपडीत शिरल्याने थोडक्यात बचावला. यावेळी बिबट्या डरकाळ्या फोडत तासभर झोपडीच्या कडेने घिरट्या घेत होता. बिबट्या झोपडीत शिरण्याची शक्यता लक्षात घेऊन झोपडीतील तरुणांनी जीव मुठीत धरून पेट्रोलवरील फवारणीचा पंप सुरू करुन आवाजाने बिबट्याला पळवून लावण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात तरुणाच्या पायाला बिबट्याने चावा घेतला असून चांगलीच दुखापत केली आहे.

सकाळी या घटनेची माहिती नरेश ढोमे यांनी वनविभागाला दिल्यानंतर वनविभागाचे वनपाल, वनरक्षक यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पहाणी करून पंचनामा केला. जखमी तरुणाला प्राथमिक आरोग्य केंद्र टाकळी हाजी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. शिरूर तालुक्यात बेटभागात बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यामुळे नागरीकांचे अस्तित्व धोक्यात आले असून जांबुत, पिंपरखेड परिसरातील नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्याची नागरीकांकडून मागणी होत आहे.

नरभक्षक बिबट्या पकडण्याचे आव्हान                                                                                                                    बिबट्याच्या हल्ल्यात जांबुत येथे यापूर्वी एका बालकाला आणि आता एका व्यक्तीला जीव गमवावा लागला असून पिंपरखेड येथेही बिबट्याने जीवघेणा हल्ला केला आहे. या नरभक्षक बिबट्याला मानवाच्या रक्ताची चटक लागल्याने ते दुसरे भक्ष्य शोधत नाही. त्यामुळे नागरिकांचे जीवन धोक्यात आले असून वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी नरभक्षक बिबट्याना जेरबंद करण्याचे मोठे आव्हान वनविभागापुढे आहे.

पाळीव प्राण्यावर हल्ले करणारे बिबटे माणसावर हल्ले करू लागले आहेत. बिबट्याच्या वाढत्या संख्येबरोबर नरभक्षक बिबटे वाढू लागले असून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी बिबट प्रवन क्षेत्रात वनविभागाने तत्काळ पिंजरे लावावे अन्यथा वनविभागाच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल.
                                                                               – नरेश ढोमे,
                                                                   माजी उपसरपंच पिंपरखेड

जांबूत येथील घटनास्थळी तसेच पिंपरखेड येथील घटनास्थळी तत्काळ पिंजरे लावण्यात आले आहेत. पिंपरखेड, पंचतळे, जांबूत या परिसरात एकूण पाच ठिकाणी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरे लावण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
                                                                  – मनोहर म्हसेकर,
                                                          वनपरिक्षेत्र अधिकारी, शिरूर

SCROLL FOR NEXT