पुढारी ऑनलाईन डेस्क : "आम्ही स्वत:ला नितीश कुमार यांच्या कुटुंबातील सदस्य समजतो. आम्ही समाजवादी कुटुंबातील आहोत. आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींना रोखण्यासाठी हाती झेंडा घेतला होता; पण आता तुमचा पुतण्या हा झेंडा घेऊन पुढे जाईल. तुमचा पुतण्या पंतप्रधान मोदींना रोखेल," अशा शब्दांमध्ये बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी आज बिहार विधाससभेमध्ये चाैफेर टोलेबाजी केली. बिहार विधानसभेत आज (दि.१२) विश्वासदर्शक ठरावापूर्वी ते बोलत होते.
यावेळी तेजस्वी यादव यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची खिल्ली उडवत मी त्यांचा पुतण्या आहे, असेही संबोधले. मुख्यमंत्री पुन्हा बाजू बदलणार नाहीत याची खात्री पंतप्रधान देऊ शकतील का, असा सवालही त्यांनी केला.
यावेळी तेजस्वी यादव म्हणाले की, "जर तुम्हाला कोणी विचारले की नितीश कुमार यांनी तीन वेळा शपथ का घेतली, तर तुम्ही काय म्हणाल? आधी तुम्ही त्यांच्यावर (भाजप) टीका करत होता आणि आता तुम्ही त्यांची स्तुती करताय. मतदारांनी आम्हाला प्रश्न विचारला तर आमचे राष्ट्रीय जनता दलाचे आमदार म्हणतील, आम्ही नोकऱ्या दिल्या. मात्र जनता दल संयुक्त ( जेडीयू ) पक्षाचे आमदार काय उत्तर देणार. मला 'जेडीयू'च्या आमदारांचे वाईट वाटते, असा टोलाही त्यांनी लगावला. बिहारमधील जनता नवीन सरकारच्या विरोधात उभे राहिल, असा दावा करत नऊ वेळा शपथ घेऊन इतिहास रचल्याबद्दल मी मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे आभार मानू इच्छितो, असा टोलाही त्यांनी लगावला.
हेही वाचा :