Latest

World Wrestling Championships : अंतिम पांघलने अमेरिकेच्या विश्वविजेत्याला दाखवले आस्मान

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : World Wrestling Championships : भारताची युवा महिला कुस्तीपटू अंतिम पांघल (Antim Panghal) हिने बुधवारी (दि. 20) पात्रता फेरीतील लढतीत विद्यमान विश्वविजेत्या अमेरिकेच्या ऑलिव्हिया डॉमिनिक पॅरिश हिलाला आस्मान दाखवून जागतिक कुस्ती स्पर्धेतील (World Wrestling Championships) आपल्या मोहिमेला दणक्यात सुरुवात केली. एकीकडे या जागतिक कुस्ती स्पर्धेत इतर भारतीय कुस्तीपटूंना पराभवाचा सामना करावा लागला आहे. पण अंतिम पांघलने शानदार कामगिरी करत पॅरिस ऑलिम्पिक कोटा मिळवण्याची आशा जागवली आहे.

सामन्याच्या सुरुवातीला अमेरिकन कुस्तीपटू पॅरीशने आक्रमक खेळ केला. पहिल्याच चढाईत तिने पांघलचा (Antim Panghal) उजवा पाय पकडला आणि खाली पाडले. याबरोबर पॅरीशला दोन गुण मिळाले. यानंतर ऑलिव्हियाने पुन्हा आक्रमक पवित्रा घेतला. पण 19 वर्षीय पंघालने मात्र भक्कम बचाव केला. पहिल्या फेरी अखेर भारतीय कुस्तीपटू 0-2 ने पिछाडीवर पडली. पण त्यानंतर पंघालने जोरदार पुनरागमन केले. तिने आपला भक्कम बचाव कायम ठेवला आणि पॅरीशला कोणत्याही प्रकारे आक्रमण करू दिले नाही. त्यानंतर भारतीय कुस्तीपटूने अमेरिकन खेळाडूचा डावा पाय पकडून तिला खाली फेकले आणि दोन गुण मिळवून सामना बरोबरीत आणला. पॅरिशने नंतर निष्क्रिय राहिल्यामुळे एक गुण गमावला. याचबरोबर एक गुणाची ही आघाडी भारताच्या पांघलने शेवटपर्यंत कायम राखली आणि विजय मिळवला.

भारताच्या पाच महिला कुस्तीपटू आणि 10 पुरुष फ्री स्टाईल कुस्तीपटू आधीच स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. ते ऑलिम्पिक कोटा गाठण्यात किंवा बिगर ऑलिम्पिक प्रकारांमध्ये पदक जिंकण्यात अपयशी ठरले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT