Latest

Duleep Trophy : यशस्वी जैस्वालचे विक्रमी द्विशतक

Arun Patil

कोईमत्तूर, वृत्तसंस्था : 20 वर्षीय यशस्वी जैस्वालने शुक्रवारी ऐतिहासिक खेळी केली. पश्चिम विभाग विरुद्ध दक्षिण विभाग यांच्यात दुलीप चषक क्रिकेट (Duleep Trophy) स्पर्धेची अंतिम लढत सुरू आहे. दक्षिण विभागाने पहिल्या डावात 57 धावांची आघाडी घेत पश्चिम विभागाला बॅकफूटवर फेकले, परंतु त्यांनी दुसर्‍या डावात शानदार खेळ केला आणि 315 धावांची भक्कम आघाडी घेतली आहे. यात यशस्वीच्या द्विशतकाचा समावेश आहे. यशस्वीने शुक्रवारी सामन्याच्या तिसर्‍या दिवशी द्विशतक झळकावताना 1962 साली अजित वाडेकर यांनी नोंदवलेला विक्रम मोडला.

हेत पटेल (98) व जयदेव उनाडकट (47) यांनी पहिल्या डावात पश्चिम विभागाला सावरले आणि 270 धावांपर्यंत पोहोचवले. दक्षिण विभागाच्या आर. साई किशोरने 86 धावांत 5 विकेटस् घेतल्या. बसिल थम्पी व सी स्टीफन यांनी प्रत्येकी दोन विकेटस् घेतल्या. त्यांच्या फलंदाजांनीही चांगली कामगिरी केली. बाबा अपराजितने 125 चेंडूंत 14 चौकारांसह 118 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. मनिष पांडे (48), कृष्णप्पा गौतम (43) व रवी तेजा (34) यांनी धावसंख्येत हातभार लावला. दक्षिण विभागाला पहिल्या डावात 327 धावा करता आल्या. जयदेवने 4, अतित शेठने 3 व चिंतन गजाने 2 विकेटस् घेतल्या.

दुसर्‍या डावातही कर्णधार अजिंक्य रहाणे (15) अपयशी ठरला. यशस्वी व प्रियांक पांचाळ यांनी पहिल्या विकेटसाठी 110 धावांची भागीदारी करून वेस्ट झोनला चांगली सुरुवात करून दिली. प्रियांक 40 धावांवर बाद झाला. त्यानंतर यशस्वी व श्रेयस अय्यरची जोडी जमली. त्यांनी तिसर्‍या विकेटसाठी 167 धावांची भागीदारी करताना संघाला तीनशेपार नेले. श्रेयस 113 धावांत 4 चौकार व 2 षटकारांसह 71 धावांवर बाद झाला; परंतु यशस्वी खिंड लढवली. त्याने 244 चेंडूंत 23 चौकार व 3 षटकारांसह नाबाद 209 धावा करताना संघाला 3 बाद 376 धावांपर्यंत पोहोचवले आहे. वेस्ट झोनने आता 319 धावांची आघाडी घेतली आहे.

अजित वाडेकरांचा विक्रम मोडला 

यशस्वीने दुलीप चषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत नॉर्थ इस्ट झोनविरुद्धही द्विशतक झळकावले होते. प्रथम श्रेणी क्रिकेटच्या अंतिम सामन्यात द्विशतक झळकावणारा तो भारताचा युवा फलंदाज ठरला. अजित वाडेकर यांनी 1962 मध्ये राजस्थान विरुद्ध 20 वर्ष व 354 दिवसांचे असताना द्विशतक झळकावले होते. यशस्वी आज 20 वर्ष व 269 दिवसांचा आहे.

संक्षिप्त धावफलक (Duleep Trophy)

पश्चिम विभाग पहिला डाव : सर्वबाद 270 धावा.
दक्षिण विभाग पहिला डाव : सर्वबाद 327 धावा.
पश्चिम विभाग दुसरा डाव : 3 बाद 376 धावा. (यशस्वी जैस्वाल नाबाद 209, प्रियांक पांचाळ 40, सरफराज खान नाबाद 30. आर. साईकिशोर 2/100.)

SCROLL FOR NEXT